पुन्हई ग्रामपंचायत बनली भ्रष्टाचाराचे कुरण? पंधराव्या वित्त आयोगातून सरपंच पुत्राने १ लाख ३५ खाल्ल्याचा आरोप....
Sep 16, 2024, 08:40 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मोताळा तालुक्यातील पुन्हई ग्रामपंचायतच्या पंधरावा वित्त आयोगाच्या फंडातून चक्क एक लाख पस्तीस हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवण्याचा प्रकार सरपंच पुत्राने केला आहे. या सरपंच पुत्राची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच सरपंच यांना पदावरून पायउतार करण्यात यावे अशा आशयाची तक्रार ग्रामपंचायत सदस्या वंदना प्रकाश सुरडकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
पुन्हई रिधोरा गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ सदस्यांची संख्या आहे.सदर ग्रामपंचायतच्या सरपंच ह्या ताईबाई अरुण सावंग आहेत. सरपंच यांचे पुत्र अमोल सावंग यांनी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग फंडातून चक्क १ लाख ३५ हजार रुपये एवढी रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले असून त्याच्या स्वतःच्या घरगुती कामासाठी वापर करत अपहार केला आहे.सदर सरपंच पुत्राचे बँक खात्याचे विवरण ग्रामपंचायत सदस्य वंदना प्रकाश सुरळकर यांच्याकडे आहे.तसेच सरपंच पुत्र अमोल सावंग याच्या नावे महाराष्ट्र शासनाच्या जागेचा ८ अ सुद्धा आहे. त्यामुळे सरपंच व सरपंच पुत्र यांची चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सरपंच यांना पदावरून पायउतार करण्यात यावे अन्यथा नाईलाजाने उपोषणात बसावे लागेल असा इशारा यावेळी तक्रारी मधून ग्रामपंचायत सदस्या वंदना सुरडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.