जिल्ह्यासाठी मोठी खुशखबर! बल्लारशहा एक्स्प्रेसला शेगावात थांबा मंजूर; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश! आजपासून सेवा सुरू...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संत नगरी शेगावकडे जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासा देणारा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून, एलटीटी–बल्लारशहा सुपरफास्ट एक्स्प्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. आज बुधवार, दि. ६ मे पासून ही गाडी नियमितपणे शेगाव येथे थांबणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शेगाव रेल्वे स्थानकावर गाडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. विदर्भाची ‘पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथे दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या मार्गावरील महत्त्वाची असलेली एलटीटी–बल्लारशहा एक्स्प्रेस शेगाव येथे थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी अलीकडेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या गाडीला थांबा देण्याची मागणी लावून धरली होती.

त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने या गाडीचा शेगाव थांबा मंजूर केला असून, त्यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नव्या वेळापत्रकानुसार, मुंबईहून बल्लारशाकडे जाणारी गाडी सकाळी ६ वाजता, तर बल्लारशाहून मुंबईकडे परतणारी गाडी रात्री ८ वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.या सुपरफास्ट गाडीच्या थांब्यामुळे शेगावला येणाऱ्या भाविकांसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.