'वीज' जाळणारी ग्रामपंचायत! पातोंडा - पेडक्यात दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट, प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे लाखोंची उधळपट्ट..महावितरण'च्या विजेची बचत करा आवाहनाला केराची टोपली..!
May 29, 2026, 12:11 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):२४ तास उजळतोय गाव, वीज बचतीचे तीन-तेरा; ग्रामस्थ संतप्त - "आमच्याच पैशाने दिवाळी साजरी करता काय?" पातोंडा - पेडका एकीकडे महावितरण 'एक युनिट वाचवा, एक दिवा लावा' म्हणून गळा काढतंय, तर दुसरीकडे पातोंडा - पेडका गट ग्रामपंचायतीने वीज उधळपट्टीचा नवा विक्रम केलाय. गावातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्लीबोळातील स्ट्रीट लाईट गेल्या महिन्याभरापासून रात्रंदिवस तळपत आहेत.
'बुलडाणा लाइव्ह'च्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली असता दुपारी २ वाजताही गावातील ४० हून अधिक पथदिवे विनाकारण सुरू होते. कडक उन्हात दिव्यांचा उजेड रस्त्यावर पडत होता. यामुळे दररोज शेकडो युनिट विजेचा अपव्यय होत आहे. अंदाजे महिन्याला हजारांचे अतिरिक्त वीजबिल ग्रामपंचायतीच्या माथी बसणार आहे. शेतात लोडशेडिंग, घरात वीज कपात, आणि इथे दिवसभर दिवे जळतायत. हा आमच्या कराच्या पैशांचा अपव्यय नाही का?" असा जळजळीत सवाल ग्रामस्थ करीत आहेत. "ग्रामसेवक आणि सरपंच फक्त खुर्च्या उबवतात का? टायमर नादुरुस्त असेल तर दुरुस्ती करा, नाहीतर मॅन्युअली बंद करा," अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
महावितरणचे अधिकारी वारंवार वीज बचतीचे आवाहन करतात. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने लोडशेडिंगचे संकट आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणाच अशी बेजबाबदारी दाखवत असेल तर 'बोले तैसा चाले' कोण?
वीज बिलाचा भुर्दंड सामान्य जनतेच्या माथी मारणाऱ्या या 'उजेडातल्या अंधाराला' जबाबदार कोण? टायमरचा बहाणा करून वीज चोरीला मूक संमती देणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई होणार का? की 'चलता है' म्हणून हे प्रकरण दाबले जाणार?