

आई रेणुकेच्या दर्शनाला चला हो..! खामगाव वरून आता माहूरगडला जाण्यासाठी थेट बससेवा; पहा कसे आहे वेळापत्रक
Mar 25, 2025, 11:11 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या माहूरच्या आई रेणुका देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा नेहमीच ओघ असतो. बुलढाणा जिल्ह्यातून देखील हजारोंच्या संख्येने भाविक माहूरगडला जात असतात. आता खामगाव वरून थेट एसटी बसने माहूरगडला जाता येणार आहे. ज्याचा फायदा महिला आणि वृद्धांना अधिक होणार आहे. दररोज खामगाव बस स्थानकावरून माहूरगड साठी बस सुटणार आहे.
भाजप सैनिक सेलचे माजी मेजर सुभाष फेरन यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनीदेखील त्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला निर्देश दिले होते. काल, आगार नियंत्रक संजय आकोत यांच्या आदेशानुसार खामगाव ते माहूरगड या बसचे पूजन करण्यात आले. चालक वाहक यांना शाल श्रीफळ देऊन बस रवाना करण्यात आली. खामगाव बस स्थानकावरून दररोज दुपारी २ वाजता माहूरगड साठी बस निघेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ही बस माहूरगड वरून निघून दुपारी १२ वाजता खामगाव येथे पोहोचेल. ही बस खामगाव, शेगाव, बाळापुर,वाडेगाव ,पातुर ,मेडशी, मालेगाव, वाशिम, अनसिंग, पुसद या मार्गे माहूरला पोहचेल..
पहिली बस रवाना करतेवेळी स्वाती आंबटकर, सरला तिजारे, मोहिनी पाटील, गजानन सोनोने आदी उपस्थित होते.