अजित दादा गटातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रभाव संपुष्टात; सभापती सुभाष पेसोडे अखेर पायउतार...
Nov 15, 2025, 12:10 IST
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :
नुकतेच काँग्रेसला रामराम करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गेल्या वीस वर्षांपासून पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता राखली होती. मात्र सभापती सुभाष पेसोडे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांना अखेर पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
खामगाव व बुलढाणा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात १३ नोव्हेंबर रोजी मोठी राजकीय घडामोड घडली. बाजार समितीवर दोन दशके सानंदा गटाचे वर्चस्व असताना, आकाश फुंडकर यांच्या पुढाकाराने काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील व वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी परिवर्तन पॅनल उभे करण्यात आले. या पॅनलचे सर्व अधिकार ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले.
ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी विरोधकांसह सत्ताधारी गटातील मिळून १२ संचालकांच्या स्वाक्षरींसह जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला.
१४ नोव्हेंबरला झालेल्या मतदानात १२ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर एकच संचालक पेसोडे यांच्या बाजूने राहिला. पाच संचालक सभेला गैरहजर होते. परिणामी सभापती सुभाष पेसोडे यांना पदावरून पायउतार व्हावेच लागले.
या घडामोडीनंतर, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये गेलेल्या माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
आता बाजार समितीचा पुढील सभापती कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
