दीड महिन्यांपासून पातोंडा - पेडका गावात जाणारा मुख्य रस्ता उखडून ठेवला–अजूनही पूर्ण होईना! रस्ता पूर्ण करायचाच नव्हता तर उखडलाच कशाला? संतप्त गावकऱ्यांचा सवाल..!

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):गेल्या दीड महिन्यांपासून खामगाव पातोंडा - पेडका गावात जाणारा मुख्य रस्ता नव्याने दुरुस्ती साठी ठेकेदाराने उखडून ठेवला आहे. आजपर्यंत सुद्धा हा रस्ता पूर्ण करण्यात आला नाही.आमच्या गावचा रस्ता पूर्ण करायचाच नव्हता तर मग उखडलाच कशाला? असा सवाल आता पातोंडा - पेडका येथील संतप्त गावकरी करीत आहेत.
खामगाव - मेहकर रोडवर पूर्वेला साधारण दीड किलोमीटर पातोंडा - पेडका हे गाव आहे.या गावात जाणारा मुख्य रस्ता हा गेल्या वर्षपासून खराब होवून रस्त्याला ठिकठिकाणी गड्डे पडले होते. दीड महिन्या आधी ठेकेदाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. रस्ता ठिकठिकाणी दुरुस्तीच्या नावावर फक्त उखडून ठेवला आहे. रस्ता दुरुस्तीच्या पुढील कामाला सुरुवात केली नाही.या रस्त्याने बाहेरगावी शिक्षणासाठी दररोज गावातील तीनशेहुन अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या वाहनाने जातात. ठेकेदाराने मध्येच रस्ता उखडून ठेवल्याने, काम पूर्ण न केल्यामुळे या विद्यार्थ्यांना या रस्त्याचा त्रास होत. वाहनांची तुटफुट होते, त्यामुळे संबंधित ठेकेदाराने लवकरात - लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. रस्ता पूर्णच करायचा नव्हता तर मग उखडलाच कशाला? असा संतप्त सवालही गावकरी करीत आहेत.