खामगाव-मेहकर रोडवर डिझेल टँकर पलटी; डिझेल लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड!
Updated: May 6, 2025, 12:43 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव-मेहकर रोडवरील गोमेधर फाट्याजवळ आज एक डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. टँकर उलटल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत डिझेल भरून नेण्याचा धुडगूस घातला. काही ठिकाणी डिझेल भरण्यावरून वाद आणि झटापटीचंही दृश्य पाहायला मिळालं.
टँकर मुंबईहून खामगावकडे डिझेल घेऊन जात होता. मात्र गोमेधर फाट्याजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकर पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत टँकरमधील चालक आणि क्लीनरला बाहेर काढलं. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.
या घटनेनंतर डिझेलचे लोभापायी अनेक नागरिकांनी थेट टँकरकडे धाव घेतली आणि आपल्या सोयीनुसार बॉटल्स, कॅन, ड्रममध्ये डिझेल भरून नेले. घटनास्थळी प्रशासन पोहोचण्याआधीच टँकरमधील बहुतांश डिझेल नागरिकांनी चोरून नेल्याची माहिती आहे.
हा प्रकार अत्यंत धोकादायक असून यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. अपघाताची नोंद घेऊन पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.