वानखेडमध्ये डेंग्यूचा धोका, तरीही आरोग्य यंत्रणा सुस्तच..!
Sep 15, 2024, 11:28 IST
संग्रामपूर(स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालूक्यातील वानखेड गावात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण दिसून येत आहेत. मात्र असे असले तरी आरोग्य यंत्रणेकडून मात्र अद्याप कुठल्याच ठोस उपाययोजना आखल्याचे दिसत नाही. अद्याप गृहभेटी सर्वेक्षण सुद्घा आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
वानखेड मध्ये डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसणारे अनेक लहान मुले शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत. याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, पावसाळ्यातील साथरोगांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विशेष काळजी घेण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कीटक सर्वेक्षण व गृहभेट दिसून येत नाही. गावच्या स्वच्छतेचा जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतींचेही याकडे दुर्लक्ष आहे. नाली काढणे, स्वच्छता राखणे हा आपला ‘जॉबचार्ट’ आहे, याचाच विसर ग्रा.पं. ला पडल्याचे चित्र आहे.यामुळेच गावात साथीच्या आजाराचा धोका बळावत चालला आहे. तापरोगांचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः बालकं यामुळे बेजार झाले आहेत. वरवट बकाल व लगतच्या शहरातील विविध दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराचे अनेक रूग्ण उपचार घेत आहेत.
उपाययोजनांबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला यांनी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देऊ, असे सांगितले.
सर्वेक्षण अन् गृहभेटी केेव्हा?
दरम्यान, साथरोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांनी सम, विषम क्रमांक दिलेल्या घरातील पाण्याचे साठे, तेथील कीटकांची स्थिती तपासणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य सेविका यांनी व्यक्तिगत सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. असे असताना वानखेड गावा मध्ये गृहभेटी होतच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एम क्रमांकानुसार घराला पंधरवड्यातून एकदा भेटी देणं, पाणीसाठे तपासणे या कामाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना सोयरसुतक राहिले नाही. यामुळे या गृहभेटी, सर्वेक्षण वाढवावे अशी मागणी होत आहे
वानखेड मध्ये दूषित पाणीपुरवठा
ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. ते बंधनकारक असतानाही वानखेड ग्राम पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे अनेक आजार नागरिकांना होत असून अनेकांना हॉस्पिटलवर करावा लागणाऱ्या खर्च पाणी पट्टी अन् घरपट्टीपेक्षाही कित्येक पटीने आहे. ग्रामपंचायत स्वच्छ पाण्याची जबाबदारी घेत नसेल तर तसे जाहीर का करत नाही ? असा सवालही नागरिक विचारत आहेत.
"वानखेड गावचे ग्रामविकास अधिकारी एम .एन .बोडखे यांनी पदभार घेतला तेव्हापासून ग्रामपंचायत कारभार हा सुस्त अवस्थेत पडला आहे तसेच अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून कुठल्याही प्रकारे पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नाही. अनेक ठिकाणी घाणीची साम्राज्य व मच्छरांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे डेंगूची लागण सुद्धा येथे पाहावयास मिळत आहे अशा सुस्त कारभार चालवणाऱ्या ग्रामसेवकांवर योग्य ती कारवाई करून त्याची त्यांची उचल बांगडी करणे गरजेचे आहे"
- विठ्ठल पिंजरकर नागरिक वानखेड