Buldana Live बांधावर… शेतकऱ्याचे हृदयद्रावक उद्‌गार ऐकून तुमच्‍याही काळजात होईल धस्स… “असं वाटतं आता शेतातच झोपून राहावं काही घेऊन!’; पिके जगविण्यासाठीची धडपड दिसली!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहिल्यांदा पेरलं पण उगवलं नाही… दुसऱ्यांदा पेरलेलं उगवलं मात्र पाऊसच नसल्याने उगवलेलं पिक करपून गेलं. हवामान खात्यानं पाऊस पडेल असं सांगितल्याने पुन्हा तिसऱ्यांदा पेरलंय. मात्र पाण्याने पुन्हा चाट मारली. आता सकाळपासून हातानं पाणी द्यायचं काम करतोय. घरचे पोरंबाळंही मदत करतात. पण आसं कितीक दिवस करावं..? कोणी कृषी …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पहिल्यांदा पेरलं पण उगवलं नाही… दुसऱ्यांदा पेरलेलं उगवलं मात्र पाऊसच नसल्याने उगवलेलं पिक करपून गेलं. हवामान खात्यानं पाऊस पडेल असं सांगितल्याने पुन्हा तिसऱ्यांदा पेरलंय. मात्र पाण्याने पुन्हा चाट मारली. आता सकाळपासून हातानं पाणी द्यायचं काम करतोय. घरचे पोरंबाळंही मदत करतात. पण आसं कितीक दिवस करावं..? कोणी कृषी अधिकारी इथं वावरात आले नाहीत… पेरणी तिसऱ्यांदा करूनही अशी परिस्‍थिती आहे. कर्ज मिळालेले नाही. व्याजाने पैसे काढून पेरत आलो. आता ते शक्य नाही. त्यामुळे हे पीक हातातून गेलं तर शेती तशीच पडून राहू देऊ, अशी हतबलता व्यक्‍त करतानाच एकाएकी स्तब्ध होतं, “असं वाटतं आता शेतातच झोपून राहावं काही घेऊन!..’ हे वाक्‍य त्यांनी उच्चारलं अन्‌ आमच्याही काळजात धस्स झालं… अत्‍यंत विदारक असं चित्र…शेतकरी श्रीराम तोताराम आसने बुलडाणा लाइव्हशी बोलताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्‍या डोळ्यांत अंजन घालणारं वास्तव मांडत होते. जिल्ह्यातून विशेषतः घाटाखालील भागांत पाऊस गायब झाला आहे. त्‍यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा लाइव्हने थेट बांधावर जाऊन त्‍यांच्‍याशी संवाद साधला…

चिखली, मेहकर,सिंदखेड राजा तालुक्यातील काही गावांत अतिवृष्टी झाल्याने दुबार पेरणी तर घाटाखालील तालुक्यांत पाऊस नसल्याने दुबार आणि तिबार पेरणीचे संकट आहे. जिल्ह्यातील ९० महसूल मंडळांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आहे. यातील काही शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा केलेली पेरणीही पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र बुलडाणा लाइव्हने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती गावात पाहणी केली असता येथील अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केलेली तिबार पेरणीही वाया जाण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे पेरण्या केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुबार, तिबार पेरण्या होऊनही कृषी विभागाचे अधिकारी बांधावर आले नाहीत. पंचनामे केले नाहीत, अशी तक्रारही शेतकऱ्यांनी मांडली. पेरणीसाठी बँकेने कर्ज दिले नाही म्हणून व्याजाने पैसे काढले, तेही संपले आता पेरणी करावी तर कशी, असा सवाल तिसऱ्यांदा पेरणी केलेले सारोळामारोती (ता. मोताळा) येथील शेतकरी एकनाथ व्यवहारे यांनी केला.

पिके जगवण्यासाठी धडपड…
तिसऱ्यांदा पेरलेली कपाशी करपण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत व्याजाने पैसे घेऊन खर्च केला. आता चौथ्यांदा कसं याची चिंता लागलेले शेतकरी एकनाथ व्यवहारे पाठीवर पंप घेऊन पिकाला जगवण्यासाठी धडपड करतात. सकाळी सहापासून त्यांची ही धडपड सुरू असते. विहिरीतील पाणी हाताने काढायचं. ते फवारणी पंपात भरून पाठीवर घेऊन पिकाला पाणी द्यायचं. मूल बाळही या कामात त्यांना मदत करतात.

कृषी विभाग झोपेत
या सर्व प्रकारापासून कृषी विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात किती ठिकाणी दुबार आणि तिबार पेरणी झाली याची जिल्ह्याच्या कृषी विभागाला कल्पनाच नसल्याचे समोर आले.

तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या -रविकांत तुपकर
जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. दुबार, तिबार पेरणी होऊनही कृषी विभाग झोपेत असेल तर हे दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी विधानसभेत भांडण करण्यात व्यस्त आहेत. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. सरकार माय बाप असतं. दुबार तिबार पेरणी करायला शेतकऱ्यांनी बियाणं आणायचं कुठून? सरकारनं बियाण्याची तातडीने व्यवस्था करावी. दुबार,तिबार पेरणीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडावी.सरकारने हात झटकून चालणार नाही, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना केली.

शेतकऱ्यांनी मानले बुलडाणा लाइव्हचे आभार
शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. अधिकारी येत नाहीत. बँका कर्ज देत नाहीत. चकरा मारायला लावतात. पण बुलडाणा लाइव्ह शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याने शेतकऱ्यांनी बुलडाणा लाइव्हचे आभार मानले.