Buldana Live Exclusive : दुसऱ्या लाटेत स्‍वयंसेवी संस्‍था, नेते भूमिगत!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षी लॉकडाऊन, कोरोना काळात शासनाबरोबरच अनेक सामाजिक संस्था, नेतेमंडळी संकटात सापडलेल्या गोरगरीबांच्या मदतीसाठी सरसावली होती. अर्थात यातही काही बोटावर मोजण्याइतक्या संस्था, नेते सक्रिय तळमळीने सेवा देत होत्या तर काही संधीसाधू ‘दानशूर’तेचा आव आणून प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनाच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेत आता हे सर्वच …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षी लॉकडाऊन, कोरोना काळात शासनाबरोबरच अनेक सामाजिक संस्था, नेतेमंडळी संकटात सापडलेल्या गोरगरीबांच्‍या मदतीसाठी सरसावली होती. अर्थात यातही काही बोटावर मोजण्याइतक्या संस्था, नेते सक्रिय तळमळीने सेवा देत होत्या तर काही संधीसाधू ‘दानशूर’तेचा आव आणून प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्‍न करत होते. कोरोनाच्‍या सध्याच्‍या दुसऱ्या लाटेत आता हे सर्वच चेहरे हरवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि जाणारे बळी यामुळे मदतीसाठी पुढे येणारे हात थरथरले की काय, अशी शंका आणणारे चित्र समोर येत आहे.

गेल्या वर्षी प्रामाणिक चेहऱ्यांबरोबर काही प्रसिद्धीहव्यासू चेहरेही होते. डझनभर केळी वाटपाला दोन डझन कार्यकर्ते असायचे. काही स्वयंसेवी संस्थांनी तर कोरोना योद्धा प्रमाणपत्र देण्याचा सपाटा लावला होता. काही नेत्यांनी स्वतःला कोरोना योद्धा म्हणून घ्यायला सुरुवात केली होती. काही प्रामाणिक मंडळी मात्र धान्यवाटप, अन्‍नवाटपासह जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत होती. मानवतावादाचा उदात्त हेतू मनात ठेवून त्‍यांच्‍याकडून हे सर्व घडत होते. सध्या असे मदतीला पुढे सरवणारे हात फारसे दिसत नाहीत. काही नेत्‍यांनी कोविड रुग्‍णालये सुरू केली आहेत, रुग्‍णालयातील नातेवाइकांच्‍या जेवणाची व्‍यवस्‍था केली आहे. मात्र घरात बसलेल्या गोरगरीबांची उपासमार 10 दिवसांच्‍या लॉकडाऊनमध्ये अटळ आहे. या 10 दिवसांत काही भूकबळीही जाऊ शकतील. याची वेळीच प्रशासन आणि सामाजिक संस्‍था, नेत्‍यांनी लक्षात घेण्याची गरज आहे आणि त्‍यांच्‍या पोटात दिवसातून एकवेळेस तरी अन्नास घास जाईल याची दक्षता घेण्याची गरज आहे.

सामाजिक कार्याची आवड असणारे, मानवतावाद दाखवणारे कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेने खरंच भयभीत झाले की त्यांनी दाखवलेली त्यावेळची मानवता आणि सेवा दिखावा होता, असाही प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. आज संकट काळात खऱ्या गरजूंना सहाय्य करण्यासाठी निस्वार्थ हेतूने कार्य करणाऱ्या संस्थांची नेत्यांची गरज आहे.