खामगावच्या तलाव रोडवर धाडसी चोरी; दोन व्यावसायिक आस्थापनांमधून लाखोंची रोकड लंपास;मध्यरात्रीनंतरचा प्रकार; व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण...
Jan 23, 2026, 13:50 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील अत्यंत वर्दळीचा व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या तलाव रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर काळोखाचा फायदा घेत लाखोंची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना २२ जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे खामगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तलाव रोडवरील पार्ले शिवांगी बेकर्स आणि ओम शंकर ॲग्रो मिल या दोन नामांकित व्यावसायिक आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला व कपाटांमध्ये ठेवलेली मोठ्या प्रमाणातील रोकड चोरून नेली.
नेहमीप्रमाणे सकाळी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्मचारी व मालक कार्यालयात आले असता, कुलूप तुटलेले, साहित्य अस्ताव्यस्त, कपाटे उघडी व कागदपत्रे विखुरलेली दिसून आली. रोकड गायब असल्याचे लक्षात येताच चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसराची बारकाईने पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध
पोलिसांकडून घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी झालेल्या चोरीच्या घटनांशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.
या चोरीमुळे तलाव रोड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
