संत नगरी शेगावात उसाला भक्तीचा महासागर! श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी; मंदिर रात्रभर राहणार उघडे....
Feb 20, 2025, 11:57 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री संत गजानन महाराज यांच्या "१४७"व्या प्रगट दिनानिमित्त आज,२० फेब्रुवारीला संत नगरी शेगावात लाखो भाविकांचा महासागर उसळला आहे. राज्यासह राज्याबाहेरील भाविकांनी कालपासूनच शेगावात गर्दी केली आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता मंदिर प्रशासनाने दोन दिवस मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल १९ फेब्रुवारीच्या रात्रीपासून मंदिर उघडे आहे, शिवाय आज २० फेब्रुवारीच्या रात्री देखील पूर्णवेळ मंदिर उघडी असल्याने भाविकांना दर्शन घेता येणार आहे..
संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवाला दीड हजारांवर भजनी दिड्यांसह लाखो भाविक दाखल झाले आहेत. भक्तांच्या सेवेत श्रीं'चे मंदिर १९ फेब्रुवारीपासून चोवीस तास दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे. प्रगटदिनीही रात्रभर मंदिर सुरू राहणार आहे.यंदा 'श्रीं'चा १४७ वा प्रगटदिन सोहळा साजरा केला जात आहे. आठवडाभरापासून गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. दर्शनासाठी भक्तांची गैरसोय टाळण्याकरिता
संस्थानच्या वतीने १९ व २० फेब्रुवारीला मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज, २० फेब्रुवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत हभप भरतबुवा पाटील (म्हैसवाडी) यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी १० वाजता महारूद्र स्वाहाकार यागाची पुर्णाहुती व अवभूतस्नान होईल. सायंकाळी ४ वाजता पालखी परिक्रमा निघेल. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हभप श्रीरामबुवा ठाकरे
लातूर) यांचे काल्याचे किर्तनाने उत्सवाची समाप्ती होणार आहे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातूनही भजनी दिंड्या दाखल झाल्या आहेत. दर्शनासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे, त्यात दर्शनवारी व श्रीमुख दर्शनवारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे.