पिंप्राळ्यात कृषिमंत्री दत्तामामा भरणे मंत्री आकाश फुंडकरांनी केली नुकसाग्रस्त शेतीची पाहणी, म्हणाले - "आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं, एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही..

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एल निनोच्या तडाख्याने पावसाने दिलेला खंड आणि त्यामुळे पिकांचं झालेलं नुकसान... या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे आणि कामगार मंत्री ना. आकाश दादा फुंडकर आज थेट खामगाव तालुक्यातील पिंप्राळा शिवारात पोहोचले.

त्यांनी बांधावर जाऊन पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, "तातडीने आणि अचूक पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे."आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुले आहोत. त्यामुळे बळीराजाचे दुःख आम्ही समजू शकतो. संकटाच्या या काळात खचून जाऊ नका,"* अशी भावनिक सादही त्यांनी घातली. प्रशासनाला दिले कडक निर्देश फक्त पंचनामेच नाही तर पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवा, असे निर्देशही भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असून त्यानंतर भरीव मदतीचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यावेळी कृषी आयुक्त सुरज मांडरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.