शेगाव नगरपालिका अग्निशमन विभागात नव्या वाहनांची भर; आपत्कालीन सेवा अधिक सक्षम......

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संत नगरी शेगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नव्या आणि सुसज्ज वाहनांची भर पडली असून, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचाव कार्य अधिक जलद आणि प्रभावीपणे पार पडण्यास मदत होणार आहे.

शेगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलात सध्या कार्यरत जुन्या फायर इंजिनसह आता एक नवीन अग्निशमन गाडी, एक रेस्क्यू व्हॅन आणि दोन रेस्क्यू बाईक दाखल झाल्या आहेत. या नव्या वाहनांच्या समावेशामुळे शेगाव शहरासह परिसरातील गावांमध्ये अग्निकांड, अपघात व अन्य आपत्कालीन प्रसंगांमध्ये तातडीने मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.
अग्निशमन विभागाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनची नवीन वाहनांची मागणी काही प्रमाणात पूर्ण झाल्याने नागरिकांचे सुरक्षाविषयक हित अधिक सक्षमपणे जपले जाणार आहे. नव्या साधनसंपत्तीमुळे अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.