जिगांव धरण परिसरात २० परप्रांतीय मजुरांना विषबाधा! रात्री पत्ता कोबी, दाळ - भात खाल्ला; सकाळपासून उलटी, पोटदुखी, संडास....! वेळीच उपचार झाल्याने अनर्थ टळला...
May 22, 2025, 16:25 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – जिगांव धरण परिसरात काम करणाऱ्या सुमारे २० परप्रांतीय मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मागील दोन दिवसांत ही घटना घडली असून, वेळीच उपचार झाल्याने संभाव्य अनर्थ टळला आहे. सध्या सर्व मजुरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
मजूरांनी १९ मेच्या रात्री जेवणामध्ये पत्ताकोबीची भाजी, दाल-भात खाल्ल्यानंतर सकाळपासून उलटी, पोटदुखी व संडासचा त्रास जाणवू लागला. काही मजुरांनी जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव व कु-हा येथील आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतले.
नांदुरा येथे सहा रुग्णांना उपचारानंतर खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित १५ मजूर प्राथमिक उपचारानंतर वसाहतीत परतले आहेत.
जिगांव प्रकल्पाजवळील मांडवा गावातील वसाहतीत बिहार, झारखंड व उत्तरप्रदेश येथून आलेले ३१ मजूर वास्तव्यास आहेत. हे सर्व एका भोजनालयातूनच जेवण घेतात. आरोग्य विभाग, पिंपळगाव काळे आरोग्य केंद्र, वडनेर आणि अन्न औषध प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सर्वेक्षणात वसाहतीतील ६ घरांमध्येच आजाराची लक्षणे आढळली असून, गावातील इतर नागरिकांमध्ये कोणतेही लक्षण आढळले नाही. त्यामुळे ही प्राथमिक अन्नविषबाधा असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणांनी व्यक्त केला आहे.