सरपंचपद आरक्षणाचा मुहूर्त ठरला! 27 जानेवारीला 13 तहसीलमध्ये ठरणार आरक्षण; 29 जानेवारीला महिला आरक्षण होणार निश्‍चित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 870 सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरलाय! येत्या 27 जानेवारीला 13 तहसीलमध्ये तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली सर्व संवर्गाचे आरक्षण निश्चित करणार आहे. यापाठोपाठ 29 जानेवारीला जिल्हाधिकार्यांकडून सर्व संवर्गातील महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल.सन 2020 ते 2025 दरम्यान पार पडणार्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी 870 सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येईल. तहसीलदार आपल्या तालुक्यातील सरपंच पदाचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 870 सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरलाय! येत्या 27 जानेवारीला 13 तहसीलमध्ये तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली सर्व संवर्गाचे आरक्षण निश्‍चित करणार आहे. यापाठोपाठ 29 जानेवारीला जिल्हाधिकार्‍यांकडून सर्व संवर्गातील महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल.
सन 2020 ते 2025 दरम्यान पार पडणार्‍या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी 870 सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येईल. तहसीलदार आपल्या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित करतील. यानंतर 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिलांचे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व खुल्या प्रवर्गातील आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोडतीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील आहेर, अव्वल कारकून राम जाधव, नितीन बढे, नागोराव खरात, विजय सनिसे, स्वाती पुरी यांनी सुसज्ज नियोजन केले आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती…
दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित होणार आहे. यात नुकत्याच पार पडलेल्या 527 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याची तालुकानिहाय संख्या अशी ः बुलडाणा 66, चिखली 99, मेहकर 98, लोणार 60, सिंदखेडराजा 80, देऊळगावराजा 48, मलकापूर 49, मोताळा 65, नांदुरा 65, खामगाव 97, शेगाव 46, जळगाव 47, संग्रामपूर 50 एकूण ः 870