शेगाव संस्‍थान पोरके! एकादशीलाच शिवशंकरभाऊ पाटील यांचे देहावसान!! सायंकाळी पाचला निधन, साडेसातला अनंतात विलिन; जिल्हा शोकसागरात बुडाला

शेगाव (कृष्णा सपकाळ / ज्ञानेश्वर ताकोते) ः आयुष्यात माणूस म्हणून पैशाशिवाय, पुरस्काराशिवाय आणि कोणत्याही पोझिशन शिवाय मोठं होता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेले, शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक निष्काम कर्मयोगी शिवशंकरभाऊ सुखदेव पाटील यांचे आज, 4 ऑगस्टला सायंकाळी पाचच्या सुमारास वयाच्या 82 व्या वर्षी देहावसान झाले. एकादशीलाच त्यांनी देह ईश्वराला सोपवला. …
 

शेगाव (कृष्णा सपकाळ / ज्ञानेश्वर ताकोते) ः आयुष्यात माणूस म्हणून पैशाशिवाय, पुरस्काराशिवाय आणि कोणत्याही पोझिशन शिवाय मोठं होता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेले, शेगावच्‍या श्री संत गजानन महाराज मंदिर संस्‍थानचे विश्वस्‍त, व्‍यवस्‍थापक निष्काम कर्मयोगी शिवशंकरभाऊ सुखदेव पाटील यांचे आज, 4 ऑगस्‍टला सायंकाळी पाचच्‍या सुमारास वयाच्‍या 82 व्‍या वर्षी देहावसान झाले. एकादशीलाच त्‍यांनी देह ईश्वराला सोपवला. त्‍यांचे पूत्र निळकंठ व श्रीकांत यांनी त्‍यांच्‍या निधनाची माहिती दिली. अल्प आजाराने आणि वृद्धापकाळाने निधन झाल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

भाऊ चार दिवसांपासून आजारी होते. त्‍यांच्‍यात मल्टीऑर्गन फेलीवरची लक्षणे दिसून आली होती. डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली घरीच त्‍यांच्‍यावर वैद्यकीय पथक उपचार करत हाेते. घरातच यासाठी मेडिकल सेटअप उभारण्यात आला होता. १२ जानेवारी १९४० रोजी भाऊंचा जन्‍म झाला होता. त्‍यांच्‍या पश्चात कु. जयमालाताई शिवशंकर पाटील (शेगाव), विजयमालाताई सुनीलराव धोत्रे (अकोला), सौ. वनमालाताई संजयराव काळे (नाशिक) या तीन मुली तर निळकंठदादा शिवशंकर पाटील (शेगाव) आणि श्रीकांतदादा शिवशंकर पाटील (शेगाव) ही मुले, नातवंडे आहेत. त्‍यांची दोन्‍ही मुले श्रींच्‍या सेवेत आहेत. निळकंठ दादा यांना दोन मुले असून, श्रीकांत दादांना एक मुलगा, एक मुलगी आहे. शिवशंकर भाऊंच्‍या अन्य एका मुलीचे कांचनताई प्रमोद झाडे (अमरावती) यांचे यापूर्वीच निधन झालेले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्‍हा बाळापूर रोडवरील श्री गजानन सोसायटी परिसरातील भाऊंच्या निवासस्थानासमोर सायंकाळी साडेसहापासून अंत्यविधी सुरू झाले. 7 वाजून 32 मिनिटांनी मोठे चिरंजीव निळकंठ दादा यांनी त्‍यांना मुखाग्नी दिला. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक नियमानुसार मोजके नातेवाइक, मान्यवरांची यावेळी उपस्‍थिती होती. यात जवळच्‍या नातेवाइकांसह पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार आकाश फुंडकर, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर उपस्‍थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्‍या नेतृत्त्वात मोठा बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश
शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, की श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील अशा पण सत्य आहेत. श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश
शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं आहे. एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी, अध्यात्माच्या माध्यमातून मानवसेवेचा डोंगर उभा करणारं महान व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. शेगाव संस्थानचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शिवशंकर भाऊंचं व्यवस्थापनकौशल्य जगात सर्वोत्कृष्ट होतं. शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभारलेली यंत्रणा, केलेलं काम जगभरातल्या युवकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी शेगाव संस्थानच्या कार्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर व्यवस्थापन कौशल्य, कल्पकतेच्या बळावर संस्थानचा चेहरामोहरा बदलला. मानवसेवेला वाहून घेतलेले सेवकरी निर्माण केले. शेगावच्या मंदिर परिसरात स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. मंदिरातील दर्शनरांगेत, सोयी-सुविधांची भर घालत अमूलाग्र बदल केले. भाविकांना सहज, सुलभ, आनंददायी दर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली. भाविकांसाठी आदर्शवत भक्तनिवासांची उभारणी केली. अत्यल्प किंमतीत महाप्रसादाची व्यवस्था केली. भक्तांचा विश्वास, श्रध्देच्या बळावर शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सेवेकरांच्या माध्यमातून भाविकांना संस्थानाशी जोडून गेतलं. मंदिराच्या उत्पन्नातून भाविकांना सेवा पुरविण्याबरोबरच सर्वोत्कृष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी केली. आनंदसागरसारखी जागतिक किर्तीची बाग उभारुन अध्यात्मिक पर्यटनाला चालना दिली. कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या निधनाने मानवसेवेचा वसा घेतलेल्या सेवेकरी निर्माण करणारं चालते-बोलते विद्यापीठच हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

आयुष्याच्‍या शेवटपर्यंत संस्‍थानचे व्‍यवस्‍थापक अन्‌ विश्वस्त!
भाऊ 31 ऑगस्ट 1962 रोजी गजानन महाराज संस्थानचे सदस्य झाले हाेते. 1981 सालापासून ते आयुष्याच्‍या शेवटपर्यंत शिवशंकरभाऊ विश्‍वस्त आणि व्यवस्थापक होते. श्री हरी कुकाजी पाटील हे पहिले अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ 1909 ते 1930 असा होता. 1981 ते 22 जून 1990 पर्यंत शिवशंकर भाऊंकडे संस्थानच्या अध्यक्षपदाची आणि व्यवस्थापक या दोन्ही पदांची जबाबदारी होती. शिवशंकरभाऊ पाटील यांच्यामुळे संत श्री गजानन महाराज जगतविख्यात झाले. गजानन महाराज संस्थानचे शिल्पकार शिवशंंकर भाऊंना चार कन्या, दोन सुपूत्र, घरी शेती, मोठा खटला. पाटीलकीचा सरंजाम, एखाद्या संस्थानिका सारखाच, पण दानत मोठी मनाचा मोठेपणा कायम राहिला. अवघे आयुष्य त्‍यांनी श्रींच्‍या सेवेत अर्पण केले. सध्या शिवशंकरभाऊंचे चिरंजीव निळकंठदादा पाटील संस्थानचे दैनंदिन व्यवस्थापन आणि प्रशासन सांभाळत आहेत.

प्रशंसेपासून, स्तुतीपासून कायम दूर राहिले…
शिवशंकरभाऊ प्रशंसेपासून, स्तुतीपासून कायम दूर राहिले. त्‍यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत. प्रसिद्धी नाही, संयम राहिला,अहंकार नव्‍हे कार्यावर निष्ठा राहिली म्हणून सेवाकार्यासाठी विनयशील कार्यकर्त्यांची फौज भाऊ तयार करू शकले. सर्वसामान्यपणे हिंदू मंदिरे म्हणजे कचरा आणि घाण सोबतीला घेऊनच असतात, परंतु स्वच्छता पहावी तर शेगावातच, असे कायम म्‍हटले जाते याचेही श्रेय शिवशंकरभाऊंच्‍या मॅनेजमेंटला दिले जाते. शिवशंकरभाऊ पाटील यांचे जीवन धन्य झाले, असेच म्‍हणाचे लागेल. त्यांच्यावर कधी बालंट आले नाही. निरपेक्ष सेवेची कसोटी काय असते, हे कर्मवीर भाऊंच्या जीवनाकडे बघितले की लक्षात येते. महाराष्ट्राचे गेल्या पन्नास वर्षांपासून नेतृत्व करणारे पद्मविभूषण शरदराव पवार यांनी देखील शिवशंकर भाऊंच्या मॅनेजमेंट स्कीलची मुक्तकंठाने तारीफ केली होती.

सेवावृत्ती घरातल्या संस्कारांनीच रुजवली होती…
भाऊंमध्ये सेवावृत्ती घरातल्या संस्कारांनीच रुजवली होती. साधुसंतांची निरपेक्ष भावाने सेवा करणारी त्‍यांच्‍या घराण्याची सध्या सातवी पिढी आहे. नागझरीचे संत गोमाजी महाराज त्‍यांच्‍या घराण्याचे गुरू होते. त्यानंतर गर्गाचार्य महाराजांच्या सेवेची संधी मिळाली आणि मग गजानन महाराजांची भेट झाली. अगदी तरुण वयातच, जेमतेम विशीचा उंबरा ओलांडलेला होता तेव्हापासून भाऊ मंदिरात सेवा देत आहेत. शेगावातल्या शाळेत मॅट्रिकपर्यंत त्‍यांचं शिक्षण झालं. अभ्यासात फारशी गोडी नव्हती. 11 महिने खेळायचं, 1 महिना अभ्यास करायचा ही त्‍यांची पद्धत. मॅट्रिक पास झाल्यानंतर वडिलांनी त्‍यांना विचारलं होतं पुढे काय? तर भाऊ म्‍हणाले होते तुम्ही सांगाल तसं… घरची गडगंज शेती होती, तीच पाहावी असा निर्णय झाला होता. मात्र शेतात तर काहीच काम करावं लागत नाही. दुसरं काही सांगा, असे भाऊ वडिलांना म्‍हणाले तेव्हा मंदिरात फरशा बसवायचं काम चालू होतं. वडील म्हणाले त्‍यांना तिथे जाऊन देखरेख कर आणि भाऊ तेव्‍हा मंदिरात सेवेकरी म्हणून दाखल झालो.

महाराजांना तुमच्याकडून सेवा हवी आहे…
शिवशंकरभाऊंनी व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संस्थानचं काम विविध दिशांनी वाढायला सुरुवात झाली होती. मात्र या वाढीला आणि विस्ताराला भाऊंच्या कारकिर्दीत अफाट वेग आला. तोवर सेवा म्हणून भाऊंनी मंदिर बांधकामावर देखरेख, गजानन वाटिकेच्या उभारणीत सहभाग घेतला होता. जेव्हा पुरुषोत्तम पाटील यांच्यानंतर त्यांच्याकडे हे पद चालून आलं, तेव्हा ते स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामागची कारणं वेगळी होती. ही जबाबदारी येण्याआधी शेगावातल्या 11 संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्‍यांनी काम केलं होतं. नगरपरिषदेचे 6 वर्षे अध्यक्ष, सेल पर्चेसिंग सोसायटीचे 3 वर्षे अध्यक्ष, कॉटन जिनिंग अँड प्रोसेसिंगचे 3 वर्षे, लायन्स क्लबचे 1 वर्ष अध्यक्ष, गोरक्षण संस्थेचेही सचिव ते राहिले होते. शिवाय 5 धार्मिक संस्थांचे पदाधिकारीही राहिले होते. ज्या संस्था डबघाईला आल्या होत्या, बुडित होत्या, भांडणतंटे होते.. अशाच संस्थांची जबाबदारी भाऊंवर आली होती. त्या सर्व संस्था भाऊंनी महाराजांच्या कृपेने वर आणल्या. नगरपरिषदेचे अध्यक्ष भाऊ झाले तेव्हा तिचं वार्षिक उत्पन्न 18 लाख होतं, ते 5 वर्षांत भाऊंनी 58 लाख झालं. नगरपरिषदेच्या खात्यात रक्कम शिल्लक पडू लागली होती, हे विशेष. या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर संस्थानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची जबाबदारी भाऊ घ्यायला तयार नव्‍हते. डॉ. टी.के. पाटील त्‍यांच्‍या घरी आले. महाराजांना तुमच्याकडून सेवा हवी आहे, नाही म्हणायचं नाही. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, असा आदेश दिल्यावर भाऊंचं बोलणंच संपलं. थोड्याच दिवसांत जबाबदारी स्वीकारत भाऊंनी कामाला सुरुवात केली होती.

“बुलडाणा लाइव्ह’चे केले होते कौतुक
यावर्षी 12 जानेवारीला शिवशंकर भाऊंनी 82 व्या वर्षांत पदार्पण केले होते. त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्त बुलडाणा लाइव्हने निष्काम कर्मयोगी ही विशेष पुरवणी काढली होती. या पुरवणीचे प्रकाश शिवशंकरभाऊंनी करताना बुलडाणा लाइव्हच्‍या वाटचालीबद्दल कौतुकोद्‌गार काढत आशीर्वादही दिले होते.