शेगाव नगरपरिषदेचा किती हा भोंगळ कारभार… आधी उडवाउडवी, नंतर म्हणे फाईलच हरवली… मुख्याधिकाऱ्यांचाही कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याचे चित्र

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक ज्येष्ठ नागरिक सध्या शेगाव नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे वैतागले आहेत. त्यांचे काम काही असे फार मोठे नाही. पण तरीही त्यांना वारंवार चकरा मारायला लावल्या जात आहेत. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत आणि आता तर चक्क फाईलच हरवल्याचे उत्तर त्यांना दिले गेले आहे… हा नक्की काय प्रकार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी चालवला आहे आणि कशासाठी हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे मुख्याधिकाऱ्यांचा कार्यालयीन कामकाजावर आणि कर्मचाऱ्यांवर अजिबात नियंत्रण नसल्याचेच यातून दिसून येत आहे. यामुळे मुलाच्या विवाह नोंदणी करण्यासारख्या क्षुल्लक कामासाठी या ज्येष्ठ नागरिकाचे हाल होत आहेत.
शेगावातील विकासकामांबद्दल पालिकेचा कारभार सर्वश्रुत आहेत. त्यावर वारंवार टीकाही होत आली आहे. पण या टीकेचे काही सोयरसुतक कर्मचारी, अधिकाऱ्यांना वाटतेय असे अजिबात जाणवत नाही. कार्यालयीन कामकाजातील हलगर्जीपणा किती खोलवर रूजला आहे, याचे ताजे उदाहरण आता ज्येष्ठ नागरिक प्रकाश हरजीवन संघाणी यांनी समोर आले आहे. त्यांची मुले उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी राहतात. त्यांनी त्यांचा मुलगा जयेश यांच्या विवाहाची नोंदणी करण्यासाठी नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात कागदपत्रे दिली. त्यावर आवश्यक त्या स्वाक्षऱ्याही आहेत. मात्र गेल्या ३ आठवड्यांपासून या विभागातील कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. चकरा मारायला लावत आहेत. आज वेळ नाही, असे सांगितले जाते. आता तर गेल्या ३ आठवड्यांपासून त्यांची फाईलच गायब आहे. एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ नागरिकाला दिली जाणारी वागणूक संतापजनक असून, मुख्याधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर नसलेला अंकुशही याला जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. संघाणी यांनी मुख्याधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे. त्याच्या प्रती आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनाही दिल्या आहेत.