शेगावात जिल्हा परिषदेचा एक गट, पंचायत समितीचे दाेन झाले रद्द ; राेकडीया नगर पालिकेत समाविष्ट झाल्याने बसला फटका!
Jul 17, 2025, 16:02 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राेकडीया नगराचा नगर पालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे, त्याचा फटका आता बसला
असून तालुक्यातून जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दाेन गण रद्द झाले आहेत. त्यामुळे, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर हाेणार असून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर शेगाव तालुक्यात ग्रामीण लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. परंतु रोकडिया नगरच्या लोकसंख्येत घट झाली म्हणून संपूर्ण गट व गण रद्द करणे अन्यायकारक असल्याचे मत राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.
"जिथे लोकसंख्या वाढली, तिथं गट वाढायला हवा, पण उलट गटच कमी केला गेला!" – असा संतप्त सवाल आता लोकप्रतिनिधी आणि नागरिक विचारत आहेत.
तहसीलदार दीपक बाजड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडिया नगरची लोकसंख्या ८,७१५ इतकी झाली असून, त्यामुळे जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण रद्द करावे लागले.मात्र एकूण लोकसंख्या ८७,२२९ असून, त्यानुसार तीन जिल्हा परिषद गट राहायला हवेत, असे स्पष्ट मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.
शेगाव तालुक्यात असे आहेत गट
माटरगाव बुद्रुक - जानोरी गट
समाविष्ट गावे: भास्तन, कालवड, कठोरा, डोलारखेड, वरध, माटरगाव बु./खु., ब्राह्मणवाडा, सगोडा, भोनगाव, चिचखेड, मच्छिंद्रखेड, तरोडा, खातखेड, बोडगाव, डोंगरखेड उजाड इ.
जलंब - जवळा बुद्रुक गट
समाविष्ट गावे: बेलुरा, मोरगाव डिग्रस, पहूरजीरा, जलंब, कुरखेड, निंबी, सांगवा, एकफळ, आळसना, गौलखेड, खेर्डा, टाकळी विरो/हाट, लासुरा खु./बु., इरखेड, चिंचोली, सवर्णा, गायगाव, शिरजगाव निळे, वरखेड खु./बु., तित्रव, महागाव, गव्हाण, तरोडा कसबा