शेगावमध्ये माजी नगरसेवकाचा आत्मदहन करण्यापूर्वीच पोलिसांनी उचलले!; वेशांतर करून आले होते…
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगरपालिकेने आपल्या संस्थेला प्रभाग क्रमांक 1 मधील मोकळी जागा द्यावी, या मागणीसाठी माजी नगरसेवक तथा भाजप कार्यकर्ते विजय यादव यांनी आज, 25 फेब्रुवारीला नगरपालिका परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना आवरून उचलून वैद्यकीय तपासणीसाठी नेले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
यादव बेकरीमागे प्रभाग क्रमांक एकमधील मोकळी जागा वृक्षारोपण उपयोगी बगिचा, शारीरिक शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक विकासाच्या प्रयोजनासाठी युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेला देण्याची मागणी श्री. यादव यांनी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी नगरपालिकेला अनेक निवेदने व अर्ज केले होते. मात्र त्यांची ही मागणी नगरपालिका प्रशासनाने वारंवार धुडकावून लावली होती. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपला अर्ज स्वीकारून ती जागा आपल्याला मिळावी अन्यथा पालिका कार्यालयासमोर सर्वसाधारण सभेच्या दिवशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. आज, सर्वसाधारण सभा नगर पालिका कार्यालयात आयोजित केली होती. इशारा लक्षात घेऊन शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्यासह पोलीस बंदोबस्त शेगाव नगरपालिका कार्यालयाजवळ लावण्यात आला होता. यादव हे वेशांतर करून मालवाहू मेटॅडोरमध्ये बसून येत असताना पोलिसांनी त्यांना ओळखले व वाहनातून उतरण्यापूर्वी त्यांना सरळ पोलीस गाडीमध्ये उचलून नेले. पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी करण्यात आली.