वाद मिटवण्यासाठी SP अरविंद चावरिया चितोड्यात!; लोकांना शांततेचे आवाहन; म्हणाले, गुन्हा करणाऱ्यांना कठोर शासन, निरपराध लोकांवर कारवाई नाही; अफवांना बळी न पडण्याचे केले आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन कुटूंबातील वाद हा दोन समाजातील भासवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने सर्व काही व्यवस्थित नियंत्रणात ठेवलेले असताना दोन दिवसांपूर्वी काही लोकांनी भेट देऊन गावाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. बाहेरचे लोक गावात येऊन माथी भडकावण्याचे काम करतील तर आपण सावध व्हायला हवे. भडकावणाऱ्यांना बळी पडू नका. तुम्ही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन कुटूंबातील वाद हा दोन समाजातील भासवण्याचा प्रयत्‍न काही लोकांनी केला. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने सर्व काही व्यवस्थित नियंत्रणात ठेवलेले असताना दोन दिवसांपूर्वी काही लोकांनी भेट देऊन गावाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्‍न केला. बाहेरचे लोक गावात येऊन माथी भडकावण्याचे काम करतील तर आपण सावध व्हायला हवे. भडकावणाऱ्यांना बळी पडू नका. तुम्ही त्याला बळी पडलात तर त्यांचा उद्देश सफल होतो. राज्य कायद्याचे आहे. कायद्याचा सन्मान करा. चितोडा प्रकरणात निरपराध लोकांना शिक्षा होणार नाही; मात्र दोषींना सोडणारही नाही. आता गावात एकोप्याने नांदा, शांततेत रहा, असे आवाहन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी आज, 1 जुलै रोजी चितोडा गाववासियांना केले. 19 जूनच्या वादानंतर आज दुसऱ्यांदा श्री. चावरिया यांनी चितोडा येथे भेट दिली. यावेळी शांतता समितीच्या सभेचे आयोजन केले होते.

लोकप्रतिनिधी हे कुठल्याही जाती, धर्म, पंथाचे नसतात तर ते लोकांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या वादाचे राजकीय भांडवल करू नये, असा सल्लाही श्री. चावरिया यांनी लोकप्रतिनिधींना दिला. 19 जून रोजी घडलेली घटना निंदनीय होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. कारवाईतून कुणाचीही सुटका नाही. काही वाद गावपातळीवर मिटवता येतात मात्र काहींना केवळ दंडुक्याचीच भाषा समजते. कायदा सर्वांना समान आहे. मोठ्या पदावरील लोकांनाही जेलमध्ये जावं लागतं. गावात येऊन वादग्रस्त वक्तव्य करणारे व्हिडिओ व्हायरल झालेत त्याचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन त्याबाबतीतही कठोर कारवाई करण्यात येईल, असे श्री. चावरिया म्हणाले. आता खरी लढाई कोरोनाशी आहे. कोरोनाने जिंदगीचा भरवसा राहिला नाही. कशाला आपसात भांडता? प्रेमाने रहा शांतता अबाधित राखा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

आमचं आम्ही सांभाळू; बाहेरच्यांनी लक्ष घालू नका; आमदार फुंडकर यांचा गायकवाडांना टोला
आमदार संजय गायकवाड यांनी गावाला भेट देऊन जे वक्तव्य केलं. त्यामुळे वातावरण खराब झालं. कृपा करून आता जिल्ह्यातल्या किंवा बाहेरच्या कोणत्याही नेत्याने गावात येऊन वातावरण बिघडवू नका. आमचं आम्ही सांभाळू. बाहेरच्यांना लक्ष देऊ नका, असा टोला आमदार फुंडकर यांनी यावेळी आमदार संजय गायकवाड यांना लगावला.

शांतता समितीच्या बैठकीत श्री. चावरिया, आमदार फुंडकर यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव ग्रामीणचे ठाणेदार रफिक शेख, वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनुने यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.