वाढ खुंटल्याने कपाशीच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर!; संग्रामपूर तालुक्यातील हतबल शेतकऱ्याचे कृत्य
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उसनवारी करून पेरणी केली, पण रोग पडून कपाशीच्या पिकाची वाढच खुंटली. खर्च वाया गेल्याने नैराश्य येऊन शेतकऱ्याने आठ एकरातील पिकात रोटाव्हेटर फिरवल्याचा प्रकार आज, २९ ऑगस्टला संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर येथे समोर आला आहे.
संजय अजाबराव मोरखडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मालकीचे टाकळेश्वर शिवारात ११ एकर शेत आहे. त्यात पूर्वी ३ एकरात पेरणी केलेल्या क्षेत्रात कपाशी पिक बहरले. मात्र ११ पैकी ८ एकरात ९ जुलै रोजी कपाशी पिकाची पेरणी केली. रासायनीक खत, निंदण, रासायनीक किटकनाशक फवारणी करूनही वातारणाच्या बदलामुळे पिकावर रोग पडला. त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली. ८ एकर शेतातील कपाशी पिकाला एकरी १५ हजार रुपये खर्च केला. हा खर्च वाया गेला आहे. या वर्षी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी यादीत नाव नसल्याने कर्ज माफीपासून संजय मोरखडे वंचित आहेत. पूर्वीच शेतावर जिल्हा सहकारी बँकचे ७० हजार रुपये पीक कर्ज आहे. कसेबसे उसनवारी करून कपाशीचा पेरा त्यांनी केला होता. मात्र पिकाची वाढच खुंटल्याने त्यांनी नैराश्य येऊन ८ एकरातील कपाशीच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवले. कृषी विभागाने पाहणी करून त्यांना मदत करावी, अशी मागणी हा शेतकरी करत आहे.