लाज सोडली! 81 हजारांतील 70 हजार भरूनही 11 हजारांसाठी कोविड सेंटरने ठेवून घेतले रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र!; खामगावातील धक्कादायक प्रकार, जिल्ह्यात संतापाची लाट
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड रुग्णसंख्या आणि त्यांच्यावर उपचार करताना सरकारी यंत्रणेला पडणाऱ्या मर्यादांमुळे खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी प्रशासनाने दिली खरी, पण काही महाभागांनी हाही ‘धंदा’च बनवल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय सेवेचे व्रत अंगिकारण्यापूर्वी घेतलेल्या शपथेचे भानही यांना राहिलेले नाही. महामारीच्या संकटात खरेतर देवदूत बनण्याची संधी होती, पण व्यावसायिकता काहींच्या नसानसात भिनल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची सर्रास लूट सुरू आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना उपचार नाकारले जातात. प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोविड सेंटरच बंद करू, असे इशारे दिले जातात. त्यामुळे सध्याच्या संकटात प्रशासनही हतबल झाले आहे. खामगावच्या एका खासगी कोविड सेंटरने बिलातील 11 हजार रुपयांसाठी चक्क रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेवून घेतलं. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाची कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. तरीही सिटीस्कॅनच्या रिपोर्टनुसार त्याला कोरोनाबाधित दाखवून सेंटरमध्ये भरती केलं होतं. माणुसकी विकून खाणाऱ्या या कोविड सेंटर चालकाविरुद्ध सखोल चौकशी होऊन कडक कारवाईची मागणी जिल्हाभरातून होत आहे.
नांदेड येथील एका कोविड सेंटरने मृत रुग्णावर तीन दिवस उपचार करून बिल वसूल केल्याची घटना ताजी असतानाच आता खामगावच्या या नव्या घटनेने त्यावर कळस केला आहे. 13 मे रोजी खामगाव तालुक्यातील आवार येथील मंगेश गवई नावाचा तरुण सर्दी, तापेमुळे त्रस्त होऊन खामगावच्या कोविड सेंटर चालकांपैकी एका डॉक्टरांकडे गेला. त्यांनी त्याला छातीचा सिटीस्कॅन करायला सांगितला; पण सोबत पैसे नसल्याने हा रुग्ण गावी परत आला. जवळच्याच अटाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोविड रॅपिड टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाबाधित नसल्याची खात्री झाल्यावर ताप येतो म्हणून सिटीस्कॅन करूनच घेऊ, असे ठरवून सिटीस्कॅन करून घेतला. खामगावच्या त्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला असता त्यांनी कोरोनाबाधित असल्याचे सांगून त्याला भरती व्हायला सांगितले.
मंगेशने पैशांची जुळवाजुळव करून भरती झाला. नऊ दिवस उपचार घेतले व या नऊ दिवसांचे बिल रुग्णालयाने 81 हजार रुपये काढले. रुग्णाने 70 हजार रुपये जमा केल्यावर11 हजार रुपये आम्ही घरी गेल्यावर पुन्हा आणून देतो, असे म्हटल्यावरही रुग्णालयाने त्यांना सुटी देण्यास नकार दिला. पूर्ण पैसे आताच द्या नाहीतर रुग्णाला सुटी मिळणार नाही, असे सांगितले. रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन द्या आणि पैसे आणून द्या, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांनी तात्काळ मंगळसूत्र दिल्यावर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला सुटी दिली. हा सर्व प्रकार एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रुग्णालय प्रशासनाने घाबरून रुग्णाच्या नातेवाइकांना बोलावून समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. समाज माध्यमातून यावर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी रुग्णाचे नातेवाइक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्तव्याची नव्हे तर किमान शपथेची जाण ठेवा…
जिल्हाच नव्हे तर अवघा देश संकटात आहे. अशा परिस्थितीत समाज ज्यांना देवदूत म्हणतो त्यांनी किमान वैद्यकीय सेवेचे व्रत आचरण्यापूर्वी घेतलेल्या शपथेचे तरी भान ठेवण्याची गरज आहे. या संकटात व्यवसाय नाही तर माणुसकी जपण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.