मोताळ्यात कोरोनाची अजब-गजब कहाणी… पंडितराव हैराण! चाचणी न करताच अहवाल पॉझिटिव्ह!
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळ्यातील एका व्यक्तीचा चाचणी न करताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला अन् त्यांना धक्काच बसला. मोताळा येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड सेंटरमध्ये हा अजब गजब प्रकार समोर आला आहे. पंडितराव देशमुख असे त्यांचे नाव असून, हा प्रकार तांत्रिक चुकीने झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुरी यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.
मोताळ्यातील पंडितराव देशमुख यांना खोकला असल्यामुळे ते 25 फेब्रुवारी रोजी मोताळ्यातील सहकार विद्या मंदिर कोविड सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी सकाळी गेले होते. याठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र, त्यांना स्वॅबसाठी दुपारी बोलविण्यात आले होते. नंतर दुपारी पंडितराव कोरोना सेंटरमध्ये गेलेच नाही. त्यानंतर काल 5 मार्चला संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास सहकार विद्या मंदिर कोविड सेंटरमधून पंडितराव यांना एका महिला कर्मचाऱ्याने फोन करत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण चाचणीसाठी स्वॅब न देताच ते पॉझिटिव्ह आले होते. या संपूर्ण प्रकरणावरून कोरोना केंद्रातील हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.
यामुळे झाली चूक…
पंडितराव हे स्वॅब देण्यासाठी केंद्रात आले होते. स्वॅब न देताच ते निघून गेले. त्यांच्या नावाचा स्वॅब घेण्याचा ट्यूब तयार करण्यात आला होता. त्या ट्यूबमध्ये दुसऱ्या नागरिकाचा स्वॅब टाकण्यात आला. शुक्रवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला, असे तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुरी यांनी सांगितले.
तो पॉझिटिव्ह व्यक्ती कोण?
पंडितराव देशमुख यांच्या नावाने लिहिलेल्या ट्यूबमध्ये दुसऱ्याच व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता.तो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्वॅब देणारी व्यक्ती शोधली असल्याचे श्री. पुरी यांनी सांगितले.