माहेरी राहणाऱ्या बहिणीला काम देऊ नका…भाऊच सांगत होता लोकांना; उदरनिर्वाहाचा पेच निर्माण झाल्याने तिने घेतले विष!; खामगाव तालुक्‍यातील धक्कादायक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मजुरी मिळत नसल्याने ३० वर्षीय विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना १९ सप्टेंबरला जनुना (ता. खामगाव) येथे घडली होती. नवरा दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने ही विवाहिता माहेरी राहत होती. तिच्या आत्महत्येस तिचा भाऊ आणि वहिनी कारणीभूत असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल, १० ऑक्टोबरला दिली …
 
माहेरी राहणाऱ्या बहिणीला काम देऊ नका…भाऊच सांगत होता लोकांना; उदरनिर्वाहाचा पेच निर्माण झाल्याने तिने घेतले विष!; खामगाव तालुक्‍यातील धक्कादायक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मजुरी मिळत नसल्याने ३० वर्षीय विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना १९ सप्टेंबरला जनुना (ता. खामगाव) येथे घडली होती. नवरा दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने ही विवाहिता माहेरी राहत होती. तिच्‍या आत्महत्येस तिचा भाऊ आणि वहिनी कारणीभूत असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल, १० ऑक्टोबरला दिली आहे. तक्रारीवरून दिलीप शंकर इंगळे व चंदाबाई दिलीप इंगळे (रा. जनुना, ता. खामगाव) या पती-पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमा गजानन खोडके असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शंकर येडुजी इंगळे (७१, रा. जनुना,ता खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी रमाचा विवाह २०१२ साली श्रीधरनगर (ता. खामगाव) येथील गजानन जगन्‍नाथ खोडके याच्याशी झाले होते. सुरुवातीची काही वर्षे रमाला गजाननने चांगले वागविले. मात्र नंतर गजाननला दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याने ती नवऱ्याला सोडून माहेरी वडिलांकडे राहू लागली. तिच्या वडिलांच्या घराशेजारीच तिचा मोठा भाऊ दिलीप त्याच्या पत्नीसह राहतो. आईवडिलांवर तिचा व तिच्या दोन लहान मुलींचा भार नको म्हणून ती गावात मजुरी करीत होती.

मात्र तिचा भाऊ व वहिनी तिला कामावर जाऊ नको, असे म्हणत होते. कुणी तिला काम सांगायला आल्यास तिला कामाला नेऊ नका, असे सांगत होते. १७ सप्टेंबर रोजी गावातील निर्मलाबाई ढोले ही रमाच्या घराकडे आली व म्हणाली की तू आमच्यासोबत कामाला येऊ नको. तुझे भाऊ व वहिनी आम्हाला बोलतात. मुलाकडे याचा जाब विचारण्यासाठी शंकर इंगळे गेले व म्हणाले, की तिने मजुरी केली नाही तर तिचा सांभाळ तुम्ही करणार का? तिला खर्च द्या, असे म्हटल्यानंतर दिलीप इंगळे याने वडील व बहिणीला मारहाण केली. त्यामुळे रमाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. तिला तातडीने खामगाव व त्यानंतर अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १९ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला तिचा दिलीप व वहिनी चंदाबाई कारणीभूत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.