मलकापुरात अग्नितांडव; सहा दुकाने आगीत भस्मसात; करोडोंचे नुकसान; मध्यरात्रीची घटना
मलकापूर (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरात सिनेमा रोडवर 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ नंतर भीषण आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली. कापड दुकान, कापसाचे अडत दुकान, बुक डेपो, तंबाखूचे होलसेल दुकान आणि दोन अन्य गोडाऊन भस्मसात झाले असून, ही सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्याने आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केल्याचे सांगण्यात येते.
मलकापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप अजून स्पष्ट झाले नसून, यात करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. ठाकरे, एएससाय दीपक चंद्रशेखर, पोकाँ शैलेश सोनोने, अनिल डागोर, सलीम बर्डे, मिलिंद ताकतोडे, नापोकाँ मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मलकापूर नगरपालिका अग्निशामक दलाचे वासुदेव भोपळे, सुरजसिंह राजपूत, दीपकसिंह राजपूत, नीलेश चोपडे, शुभम राजपूत यांनी आग विझवली.
या दुकानांचे झाले नुकसान
सिनेमा रोडवरील सत रमेती राम टोबॅको, सुरजमल ॲन्ड कंपनी, गांधी बुक डेपो, हारूण अजीज यांची दुकाने व गोडाऊन संपूर्ण जळून खाक झालेत तर अग्रवाल स्टोअर्स व हिरालाल दिपचंद अग्रवाल यांचेही मोठे नुकसान झाले.