पहिली शेतकरी आत्महत्या; साहेबराव करपेंसह कुटुंबियांना जळगाव जामोदमध्ये श्रद्धांजली
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एल्गार संघटनेतर्फे आज, 19 मार्चला देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरलेल्या साहेबराव करपे व कुटुंबाला जळगाव जामोद येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तत्काळ पिकविमा मंजूर करावा. ३५ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ ला चिखलगव्हाण (जि. यवतमाळ) येथे पत्नी व चार मुलांसह प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.ही देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. तब्बल ३५ वर्षांनंतर देखील शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतच आहेत. शेतकऱ्यांना आजच्या आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर पिकविमा मंजूर करण्यात यावा व सक्तीची विजबिल वसुली तात्काळ थांबविण्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी राजू पाटील अवचार, रमेश बानाईत, अजहर देशमुख, बळीराम मानकर, आशिष वायझोडे, संजय देशमुख, अविनाश गावंडे, भरतसिंह सोनोने, सुनिल तायडे, दगडू गवई, श्रीराम मिसाळ, भैय्याबाप्पू देशमुख, मुजहिर मौलाना, निजाम राज आदी उपस्थित होते.