दोन वैद्यकीय अधिकारी असूनही एकाचाही नसतो पत्ता!; पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राला कर्मचारीच वाली!!; रुग्णांचे हाल
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा सर्वात मोठे गाव असून, २३ खेड्यांचा या गावाशी संपर्क असतो. पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाने दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले आहेत. डॉ. विलास चौधरी व डॉ. बोडखे मात्र नियुक्ती झाल्यापासून मनमानी कारभार करत असून, केंद्रात येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
पातुर्डा परिसरातील गरीब रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी येतात. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने त्यांना उपचार भेटत नसल्याचे चित्र आहे. औषध निर्माता एस. व्ही. शेगोकार यांनी शक्य होईल तितकी मदत रुग्णांना करताना दिसतात. आठवडाभरापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी तीनचाकी वाहनातच एका महिलेची प्रसुती झाली होती. रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाचा सामना मात्र दोष नसणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागला. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त रुग्ण व नागरिकांकडून होत आहे.