डॉ. आशिष अग्रवालचे लाईफ लाईन हॉस्पिटल सील!; विनापरवाना कोविड सेंटर सुरू करून रुग्‍णांची लूट भोवली!, गुन्‍हेही दाखल होणार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरात विनापरवाना कोविड रुग्णांवर उपचार करून आर्थिक लूट करणाऱ्या लाईफ लाईन हॉस्पिटलला सील करण्याचे व हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खामगाव येथील नांदुरा रोडवर डॉ. आशिष अग्रवाल याचे लाईफ लाईन हॉस्पिटल आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरात विनापरवाना कोविड रुग्णांवर उपचार करून आर्थिक लूट करणाऱ्या लाईफ लाईन हॉस्पिटलला सील करण्याचे व हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील नांदुरा रोडवर डॉ. आशिष अग्रवाल याचे लाईफ लाईन हॉस्पिटल आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी हॉस्पिटलला प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये पूर्वपरवानगी न घेता कोविड रुग्णांवर बिनदिक्कतपणे उपचार सुरू होते. या दरम्यान कोविड उपचारासंबंधी शासनाने निर्धारित केलेल्या प्रोटोकॉलचा भंग सुद्धा रुग्णालयाने केला होता. एका रुग्णाला जास्तीत जास्त 5 ते 7 रेमडीसीविर इंजेक्शनचा नियम असताना एकेका रुग्णाला 14 ते 15 इंजेक्शन देण्याचा प्रकार या हॉस्पिटलमध्ये घडला होता. रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी एका चौकशी समितीचे गठन केले होते. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात या हॉस्पिटलवर ठपका ठेवण्यात आल्याने हॉस्पिटल सील करण्याचे व रुग्णालय प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही; तक्रारही नाही…
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.