जामिनावर सुटलेल्‍या आरोपींची विकृती; जंगलात लावताहेत आगी; 50 हेक्‍टर आजवर खाक; वन विभागासह पोलीसही हतबल!; जळगाव जामोद तालुक्‍यातील धक्‍कादायक प्रकार

जळगाव जामोद (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोंद तस्करीच्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळताच त्यांनी दिलेल्या धमकीप्रमाणे कारवाया दिसून येत असून, त्यांनी जंगलांना आगी लावण्याची धमकी दिली होती. त्यानुसार आजवर तब्बल 50 हेक्टर जंगलाची राखरांगोळी या विकृतांनी केल्याचा संशय वनविभागाला आहे. त्यांना पकडून चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. मात्र हाती सापडत नसल्याने वनविभाग …
 

जळगाव जामोद (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोंद तस्‍करीच्‍या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळताच त्‍यांनी दिलेल्‍या धमकीप्रमाणे कारवाया दिसून येत असून, त्‍यांनी जंगलांना आगी लावण्याची धमकी दिली होती. त्‍यानुसार आजवर तब्‍बल 50 हेक्‍टर जंगलाची राखरांगोळी या विकृतांनी केल्याचा संशय वनविभागाला आहे. त्‍यांना पकडून चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. मात्र हाती सापडत नसल्याने वनविभाग आणि पोलीसही हतबल झाल्‍याचे चित्र जळगाव जामोद तालुक्‍यात दिसून येत आहे.

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात अवैधरित्या सालई गोंद वाहतूक होत होती. वनविभागाच्‍या पथकाने शिताफीने या टोळीला पकडून 210 किलो (9 पोते) गोंद जप्‍त केला होता. या गुन्ह्यात एकूण 9 आरोपी असून, 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 6 आरोपी अजूनही फरार आहेत. 3 आरोपींना जळगाव जामोद न्‍यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मिळाला. मात्र जामिनावर सुटताच आरोपींनी वनरक्षक व इतर कर्मचाऱ्यांना ‘तुमचे जंगल कसे राहते ते पाहून घेऊ’ अशा धमक्या दिलेल्या आहेत. या आरोपींना जामिन मिळाल्यापासून जंगलात आग लागण्याच्‍या घटना सुरू झाल्‍या आहेत. या आगी याच ९ आरोपींनी लावल्‍याचा संशय वनविभागाला आहे. त्‍यामुळे त्‍यांचा शोध पोलीस आणि वन विभाग घेत आहे. आरोपींविरूद्ध चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे कलम 51 (ए) (जी) नुसार जंगल जलाशये, नद्या, वन्यजीव व नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच आगीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण करून निसर्गाचा समतोल राखून पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वनक्षेत्रात आग लागल्यास नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्र. 9284335365, 7083637281 संपर्क साधावा, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी कळविल आहे.

आग लावल्याच्या घटना व वन गुन्‍हे

जामोद वर्तुळात नियतक्षेत्र पश्चिम जामोदमध्ये जळीत क्षेत्र 8 हेक्टर वनगुन्हा 5.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 2 मध्ये जळीत क्षेत्र 6 हेक्टर वनगुन्हा 6.2.2021, नियतक्षेत्र पश्चिम जामोदमध्ये जळीत क्षेत्र 7 हेक्टर वनगुन्हा 6.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 7 हेक्टर वनगुन्हा 8.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 2 मध्ये जळीत क्षेत्र 2 हेक्टर वनगुन्हा 9.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 5 हेक्टर वनगुन्हा 10.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 2 हेक्टर वनगुन्हा 11.2.2021, नियतक्षेत्र गारपेठ मध्ये जळीत क्षेत्र 5 हेक्टर वनगुन्हा 13.2.2021, नियतक्षेत्र गारपेठ मध्ये जळीत क्षेत्र 8 हेक्टर वनगुन्हा 14.2.2021. असे एकूण जळीत क्षेत्र 50 हेक्टर आहे.