क्षारयुक्त पावसामुळे पिकांना पांढरे डाग!; संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी चिंतित
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दडी मारून बसलेला पाऊस अखेर बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला असतानाच पुन्हा त्याला वेगळ्या संकटाने धडक भरली आहे. संग्रामपूर तालुक्यात सोनाळा परिसरात क्षारयुक्त पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, यामुळे पिकांवर पांढरे डाग पडले आहेत. कृषी विभागाने याबद्दल मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कपाशी, मूग, सोयाबीन पिकावर व उभ्या वाहनांवरसुद्धा पावसामुळे पांढरे डाग पडले आहेत. पिकांवर डाग दिसून येताच शेतकऱ्यांनी छतावरील पाणी संग्रहित करून ठेवले आहे. शेतातील पिकांना धोका लक्षात घेता कृषि विभागाने बांधावर येऊन क्षारयुक्त पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावे व शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी शेतकरी शेख अफरोज शेख आसिफ, नितिन टोमबी, रवि लहासे, निसार अली, सुनिल वेरुळकार, प्रकाश गोतमारे, अमोल गोमोदे आदींनी निवेदनाव्दारे तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे केली आहे.