कुछ बाते हो चुकी हैं, कुछ बाते अभी हैं बाकी… लगीन पुढं ढकलल्याने ‘वर’मंडळी हातघाईवर…!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन वर्षांपासून ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेक उपवर युवक- युवतीचे लग्न लांबणीवर पडले. ‘पसंत’ करण्याचे कार्यक्रम झाले असले तरी काहींनी थोडं थांबण्याची भूमिका घेतली आहे तर काहींनी मात्र घरगुती व साध्या पद्धतीने विवाह उरकून समाजभान जपले आहे. लग्न लांबणीवर पडलेल्यांचे मात्र “कुछ बाते हो चुकी हैं कुछ बाते अभी हैं बाकी” असेच एकूण चित्र असून, वरमंडळी मात्र हातघाईवर आली आहे.
दरवर्षी उन्हाळा म्हणजे लग्नाचा सिजन असतो. सुरुवातीला पसंती नंतर लग्नाची खरेदी आणि नंतर धुमधडाक्यात लग्न लावण्याकडे लोकांचा कल असतो. त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी सुद्धा होते. श्रीमंत लोक श्रीमंतीचा दिखावा विवाहाच्या माध्यमातून करतात. मध्यमवर्गीय लोक सुद्धा कर्ज काढून का होईना पण लग्न धुमधडाक्यात साजरे करतात. विवाहावर अनावश्यक खर्च टाळावा अशी जनजागृती नेहमी करण्यात येते परंतु त्याला फारशे यश मिळत नव्हते. मात्र कोरोना संकटाने विवाहावर होणाऱ्या खर्चाला काही प्रमाणात आळा बसला आहे. विवाहासाठी मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीलाच परवानगी असल्याने लॉन, मंगल कार्यालये, जेवणावळी, बँड यावर होणाऱ्या खर्चाला आळा बसत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून लग्न सोहळे हे घरगुती व साध्या पद्धतीने आटोपले जात आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्यात लॉकडाऊन लागल्यामुळे ठरलेले विवाह यंदाच्या उन्हाळ्यात धुमधडाक्यात करण्याचे नियोजन काहींनी केले होते. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाने उग्र रूप धारण केल्याने त्यांच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. त्यातील काहींनी यावर्षी जसे होईल तसे तर काहींनी मात्र याहीवर्षी लग्न लांबणीवर टाकण्याचे ठरवले आहे.
वधू- वरांच्या शोधालाही लागला ब्रेक
संचारबंदी, जिल्हाबंदी यामुळे प्रवासाला अनेक अडचणी येत आहेत. त्यातही स्थळ पाहण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास जिल्हाबंदीची अडचण आहेच. स्थळ पसंत आले तरी लॉकडाऊनमुळे धुमधडाक्यात लग्न होणार नाही म्हणून वधू- वरांच्या शोधाला सुद्धा ब्रेक लावून काहींनी वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे.