अमेरिकेत रेवाची झेप आकाशी… पिंप्री गवळी आनंदात न्हाले!; गावात आनंदोत्सव
मोताळा (संजय गरुडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पिंप्री गवळी (ता. मोताळा ) आजोळ असलेल्या रेवा जोगदंड या अवघ्या 14 वर्षीय मुलीने तिकडे अमेरिकेत विमानाने आकाशात झेप घेतली अन् इकडे आजोळ आनंदात न्हाले… गावकऱ्यांनी जल्लोष केला.
नांदुरा जिल्ह्यातील कोंडा (ता.अर्धापूर) या गावातील मूळ रहिवासी; मात्र सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या दिलीप आणि वंदना जोगदंड यांची रेवा ही मुलगी. हे कुटुंब 20 वर्षांपासून अमेरिकेतच राहते. दोघेही इंजिनिअर आहेत. दिलीप जोगदंड यांनी दोरीवर विमान चालविणे या विषयी संशोधन करून त्यावर यशस्वी प्रयोगही केला. तेव्हापासून रेवाने पायलट होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. दोन महिन्यांत पायलटसाठीचे प्रशिक्षणही तिने पूर्ण केले. २१ जून रोजी तिने विमानासह आकाशात झेप घेतली.
तिच्या या कर्तृत्वाची बातमी तिच्या कोंडा गावात पसरताच गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर काही वृत्त वाहिन्यांनी व वृत्तपत्रांनीही याची दखल घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी फोन करून तिचे कौतुक केले. या मुलीशी नाळ पिंप्री गवळीशी घट्ट असल्याने या गावातही आनंदोत्सव साजरा झाला. पत्रकार सुधाकर विठ्ठल बोरसे यांचे मोठे बंधू स्व. दिनकर विठ्ठल बोरसे यांनी ती नात आहे. रेवाचे मामा रवींद्र दिनकर बोरसे (पाटील) बुलडाणा येथे जल सिंचन विभागात शासकीय सेवेत आहेत. रेवाने दोन्ही गावांचा लौकिक वाढविला आहे. सुधाकर बोरसे यांनी आपल्या नातीचे आणि रवींद्र बोरसे यांनी आपल्या भाचीचे कौतुक करून आम्हाला तिचा अभिमान वाटतो, असे सांगितले.