मलाही आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार, म्‍हणून घेतला घटस्‍फोट!; नाते तुटल्याबद्दल पहिल्यांदाच बोलली मिनिषा लांबा, Mumbai Liveला दिली विशेष मुलाखत

अभिनेत्री मिनिषा लांबाने तिच्या कारकीर्दीत अनेक चांगल्या विषयांवर आधारित चित्रपट केले. व्यावसायिक चित्रपटांमधूनही तिची चमक दाखविली. सध्या ती आपल्या ‘कुतुब मीनार’ या वेब चित्रपटामुळे चर्चेत आहे. मुंबई लाइव्हने मिनिषाची भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. तो प्रश्नोत्तराच्या स्वरुपात असा ः प्रश्न ः तुझ्या कुतुब मीनार चित्रपटाबद्दल सांग? तुम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण कोठे केले?मिनिषा ः कुतुब …
 

अभिनेत्री मिनिषा लांबाने तिच्या कारकीर्दीत अनेक चांगल्या विषयांवर आधारित चित्रपट केले. व्यावसायिक चित्रपटांमधूनही तिची चमक दाखविली. सध्या ती आपल्या ‘कुतुब मीनार’ या वेब चित्रपटामुळे चर्चेत आहे. मुंबई लाइव्‍हने मिनिषाची भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. तो प्रश्नोत्तराच्‍या स्वरुपात असा ः

प्रश्न ः तुझ्या कुतुब मीनार चित्रपटाबद्दल सांग? तुम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण कोठे केले?
मिनिषा ः
कुतुब मीनारची कहाणी खूप गोड आहे. यात विनोदी, मजेदार आणि मनोरंजक प्रसंग भरपूर आहेत. एखादी व्यक्ती विभक्त झाल्यावर काय होते, समाज त्यांच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने वागतो पण या प्रकरणात अगदी हलकेपणाने चित्रण केले आहे. मी फक्त ट्रेलरची वाट पाहत आहे. चित्रपटाविषयी बरेच काही सांगू शकत नाही. त्याचा दिग्दर्शक राज आश्रू आहे, जो संगीत व्हिडिओंमुळे बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. यात करणवीर बोहरा माझा नायक आहे. त्याच्याबरोबर काम करण्यात खूप मजा आली. तो एक मस्त व्यक्ती आहे आणि तो सेट्सवर उत्साह वाढवत राहतो. त्याच्याशी सेटवर चांगली बॉन्डिंग होती. पहिल्या लॉकडाउननंतर आम्ही या वेब मूव्हीच्या शूटिंगला सुरुवात केली, शूटिंग लोकेशनवर नेटवर्क समस्या होती. त्यामुळे आम्ही कोणाशीही बोलू शकत नव्हतो. मोजक्‍या लोकांमध्ये शूटिंग व्‍हायचे.

प्रश्न ः कोरोनामुळे तुझ्या आयुष्यात किती बदल आले?
मिनिषा ः
खरोखर कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक होती. ती किती प्राणघातक होती हे आता लोकांनासुद्धा समजले आहे. त्‍यामुळे लोक यापुढे लॉकडाऊनबद्दल तक्रार करणार नाहीत. त्यांना समजले आहे की बाहेर जाणे म्हणजे त्यांच्या आयुष्यासोबत खेळायचे आहे. जर आपण घरी सुरक्षितपणे बसू शकू तर आपल्यापेक्षा कोणीही भाग्यवान नाही. खरं म्हणजे आता मी छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. मला वाटते की आपण आयुष्यात काहीही हलके घेऊ नये.

प्रश्न ः बॉलिवूड अभिनेत्री म्हणून तू बऱ्याच भूमिका साकारल्या तसेच यहां, हम तुम शबाना, बचना ए हसीनो, भूमी सारख्या बऱ्याच सिनेमांत ग्लॅमरस पात्र केले आहेत. पण त्यानंतर तुझ्या कारकीर्दीला ब्रेक लागला. याच कारण काय होते?
मिनिषा ः
हा ब्रेक कलाकारांच्या आयुष्यात जाणूनबुजून किंवा नकळत येतो. कॉर्पोरेट जगाप्रमाणेच आपल्यातील कलाकारांचे करिअर ब्रेकदेखील कधीकधी नकारात्मक ठरते. तरीही मी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर मी असे म्हणू शकते की एखादा अभिनेता ब्रेक घेऊ शकतो, अभिनयात परत येऊ शकतो आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्यासाठी वेगळ्या भूमिका तयार असतात. आता ओटीटीने बरेच बदलले आहे. आता जर तुम्ही ५ वर्षांच्या विश्रांतीनंतरही परत आलात तर तुमच्या वयाप्रमाणे आणि भूमिकेनुसार तुम्हाला चांगल्या भूमिका मिळतील. कधीकधी स्क्रिप्टमुळे थोडा वेळ लगतो. मी यापूर्वीही निवडक काम करायचे आणि अजूनही माझी अशीच वृत्ती आहे.

प्रश्न ः लग्नाच्या ५ वर्षांनंतर रायन थमपासून घटस्फोट घेतला, त्‍याबद्दल काय सांगशील…
मिनिषा ः
प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा हक्क आहे. पूर्वी समाजात घटस्फोटाकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नव्हते. मात्र आता जेव्हा महिला स्वावलंबी झाली आहे किंवा ती आपले मत व्यक्त करण्यास सक्षम आहे. तेव्हा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची असायची. तिने सर्व त्याग करण्याचा ठेका घेतलेला असायचा. आता महिलेला समजले आहे की जर ती तिच्या लग्नात आनंदी नसेल तर तिला त्या नात्यातून बाहेर पडण्याचा देखील अधिकार आहे. पाश्चिमात्य भागात तर आत्म प्रेमाची संकल्पना खूप मजबूत आहे. स्वत:च्या प्रेमाचा अर्थ स्वार्थी असणे नाही. घटस्फोट घेणे सोपे नाही परंतु जेव्हा संबंध विषारी बनतो तेव्हा सोडणे ठीक आहे. मी हेदेखील सांगू इच्छिते की आपले लग्न किंवा नातेसंबंध आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. परंतु संपूर्ण आयुष्य नव्हे. दुर्दैवाने, स्‍त्री त्यांच्या संबंध आणि वैवाहिक स्थितीद्वारे ओळखली जाते, परंतु आता काळ बदलत आहे.

प्रश्न ः आता तुझा लग्न आणि प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे?
मिनिषा ः
लग्न आणि प्रेमाबद्दल मला आता अजिबात कटुता नाही. कारण मी तरुण, सुंदर आहे. असा कुठेही नियम नाही की आपण आयुष्यात फक्त एकदाच प्रेमात पडू शकतो. आपण अविवाहित आहात तर आपल्याला प्रेम करण्याचा अधिकार आहे.

प्रश्न ः नोज सर्जरीमुळे तुला बऱ्याचदा ट्रोल केले गेले होते…
मिनिषा ः
आपल्याकडे अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल वाईट बोलणारे बरेच आहेत. आम्ही लवकर ट्रोलचे शिकार होतो आणि स्वतःचा बचाव देखील करू शकत नाहीत. आमचा व्यवसाय असा आहे की लोक चिखलफेक करतील. आता यात आपण स्वत: बद्दल स्पष्टीकरण द्या आणि मग बोलण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. अन्यथा आपण शांतपणे बसा. हे आमच्या व्यवसायाचा एक भाग आहे की आमच्या नात्यावर चर्चा होईल. आपले शरीर चर्चेचे केंद्र असेल. आपण यावर काहीही करू शकत नाही. अम्हाला फक्त हे व्यवस्‍थित हँडल करावं लागतं.