ज्वाला गुट्टा चढणार दुसर्यांदा बोहल्यावर
अभिनेता विष्णू विशालसोबत दिली प्रेमाची कबुली
नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटपटू ज्वाला गुट्टा हिने तिचा मित्र, अभिनेता विष्णू विशाल याच्यासोबत प्रेमाची कबुली देत त्याच्यासोबत दुसर्यांदा बोहल्यावर चढण्याचा इरादा बोलून दाखवला आहे.या दोघांनी ट्विटरवर त्यांचे काही रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांनी लाईक्स देत भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत.
ज्वाला गुट्टा व विष्णू विशाल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.विष्णू विशाल हा दाक्षिणात्य सिनेअभिनेता आहे. तो त्याच्या अरण्य या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.यानिमित्त एका कार्यक्रमात त्याने ज्वाला गुट्टासोबत विवाहची माहिती मीडिया व चाहत्यांना दिली आहे. ज्वाला गुट्टाला विष्णू विशालने गतवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.तसेच सप्टेंबर २०२० मध्ये लग्नासाठी प्रपोजही केले होते. अखेरीस त्या दोघांनी ट्विटरवर प्रेमाची कबुली देत लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे. ज्वाला गुट्टा हिचे हे दुसरे लग्न आहे. विष्णू विशाल हाही दुसर्यांदा बोहल्यावर चढत आहे. विष्णू विशालला पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही आहे.पण २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.