कियारा सांगते, नकार मिळाला म्हणजे करिअर संपत नसतं..!
अभिनेत्री म्हणून काम करताना अर्थपूर्ण चित्रपट मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. अशा प्रकारचा एखाद-दुसरा चित्रपट मिळाला म्हणजे झालं असं होत नाही. हल्ली विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी अभिनेत्रींना मिळतेय. मानसिकता हळूहळू बदलतेय. प्रत्येक पावलावर महिलांना स्वत:ला सिद्ध करावंच लागतं… सांगतेय कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी कियारा अडवाणी. करिअरच्या सुरुवातीला नकार पचवावा लागला. पण नकार मिळाला म्हणजे करिअर संपलं असं होत नाही, असं कियारा सांगते…
महिलाप्रधान चित्रपटात मोजके अभिनेते काम करण्यास तयार होतात. पण हॉलिवूडमध्ये अशा भूमिका मोठे कलाकार अगदी सहज करतात. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीच्या बायकोची भूमिका केली होती. ती भूमिका लहान होती. पण त्या भूमिकेनं मला अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणून ओळख दिली, असे सांगून कियारा म्हणाली, की फगली या चित्रपटानंतर अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. पण माझ्या आयुष्यातील ते वाईट दिवस होते. मला मिळणार्या भूमिका दुसर्या अभिनेत्रीला मिळाल्या. अनेक निर्मात्यांना भेटले पण आधीचा चित्रपट चालला नाही म्हणून नकार मिळायचा. ऑडिशन देत राहिले. त्यानंतर धोनी चित्रपटासाठी विचारलं गेलं. या चित्रपटानंतर पुढची सगळी गणितंच बदलून गेली, असे ती म्हणाली. महिला सशक्तीकरणाबद्दल कियारा म्हणाली, की प्रत्येक महिला दुसर्या महिलेच्या खांद्याला खांदा लावून काम करेल तेव्हाच सगळं बदलेल. महिलांकडे बघण्याची दृष्टीही बदलेल. प्रत्येक महिला दडपण, भीतीशिवाय तिला हवं ते करू शकेल तेव्हा महिला सबलीकरण झालं असं म्हणता येईल. स्वतंत्र असणं म्हणजे जग जिंकण्यासारखं आहे. आपण महिलांना शिक्षित करायला हवं. कारण कुठल्याही समस्येचं मूळ अशिक्षितपणा हे आहे, असे ती म्हणाली.