अभिनेत्री सना खान जेव्हा देऊळगाव साकर्शात पोहोचते…!
मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील पर्यटन वाढीला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे राज्यातील पर्यटन स्थळांचे प्रमोशन सध्या सुरू असून, याअंतर्गत दूर्लक्षित झालेल्या स्थळांचीही प्रसिद्धी अधिक व्यापकतेने केली जात आहे. अभिनेत्री सना खानला या स्थळांचे प्रमोशन करण्यासाठी निवडण्यात आले असून, यानिमित्ताने सनाने मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील ईसाई माता संस्थानला भेट देत चित्रिकरणही केले. सळोई, पातळ रोटीचे जेवण करून बंजारा समाजातील चालीरीती व परंपरा तिने उत्सुकतेने जाणून घेतल्या.
देऊळगाव साकर्शा येथील शासनाच्या क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त व परिसरातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे ईसाई माता संस्थान परिसरात अभिनेत्री सनाने शूटिंग केले. संस्थानची व बंजारा परंपरांबाबतची माहिती परशुराम महाराजांनी दिली. विशेष म्हणजे संस्थान परिसर पर्यटनस्थळ व्हावे म्हणून प्रस्ताव शासन दरबारी असल्याचे येथील महंत रामदास महाराज यांनी सांगितले. यावेळी सरपंच संदीप अल्हाट, ग्रामपंचायत सदस्य बाळू वानखडे, शेख अबरार रामचंद्र चव्हाण, रमेश पवार, रमेश काळे, तलाठी बालाजी माने, तलाठी श्री. सानप, बबन चव्हाण, कृष्णा चव्हाण यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.