अभिनेते कमल हासन यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला
कमल हसन थोडक्यात बचावले
कांचीपुरम : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता तामिळनाडूमध्ये अभिनेते तथा मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाचे नेते कमल हासन यांच्या ताफ्यावर एका अज्ञात इसमाने हल्ला केला आहे. यात हासन थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तामिळनाडू विधानसभेचा प्रचार सध्या जोरात असून हासन यांच्या पक्षानेही २३४ पैकी १५४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कांचीपूरम मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना कमल हासन यांच्या ताफ्यावर एक इसम धावून आला व त्याने गाडीवर हल्ला चढवला. त्याने गाडीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला. हल्ला केला त्यावेळी तो इसम दारूच्या नशेत होता व कमल हसन यांचे फॅन असल्याचे सांगत होता.हासन यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडून त्याची जोरदार धुलाई केली व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.