अप्सरा चित्रपटनिर्मितीच्या वाटेवर!
मराठी सौंदर्याची खाण अन् आपल्या दिलखेचक नयनबाणांनी समोरच्याला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजेच सोनाली कुलकर्णी. आजवर तिने मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. आता ती नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. अर्थात ही भूमिका ती पडद्यावर नाही तर प्रत्यक्षात साकारणार आहे. भाऊ अतुल कुलकर्णीसोबत मिळून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘हाकामारी’ या सिनेमाची निर्मिती ती करणार आहे. सस्पेन्स सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती असते. ‘हाकामारी’ही असाच सस्पेन्स सिनेमा असणार आहे. याबद्दल सोनाली सांगते, की अभिनेत्री होण्याआधी निर्माताच होते. रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना निर्मिती क्षेत्राने मला भुरळ घातली.मराठी इंडस्ट्रीमध्ये गुणवत्तेला वाव आहे. हाकामारी हा वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत, असे ती म्हणाली. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स, मितवा, हिरकणी, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनाली आजवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.