"मेरे देश की धरती.. सोना उगले उगले हीरे मोती" ...देशभक्तीची ज्योत रुपेरी पडद्याच्या माध्यमातून चेतवणारे भारत कुमार अर्थात आपले मनोज कुमार काळाच्या पडद्याआड..

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची ज्योत मना मना मध्ये चेतवणारे आणि आपल्या सहज सुंदर अभिनयाने मायबाप प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मनोज कुमार अर्थात आपले भारत कुमार यांनी वयाच्या ८७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, एक प्रेरणादायी पर्व समाप्त झाले आहे.  

२४ जुलै १९३७ रोजी जन्मलेले मनोज कुमार ‘भारत कुमार’ या टोपणनावाने ओळखले जायचे. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत देशभक्तीला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या चित्रपटांनी भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्तीचा नवा जाज्वल्य उत्साह निर्माण केला. त्यांनी ‘शहीद’ (१९६५), ‘उपकार’ (१९६७), ‘पूरब और पश्चिम’ (१९७०), ‘रोटी कपड़ा और मकान’ (१९७४) आणि ‘क्रांती’ (१९८१) यांसारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेशही दिला. 'उपकार' या चित्रपटातून त्यांनी "मेरे देश की धरती" हे अजरामर गीत दिले, जे आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत पेटवते.

मनोज कुमार यांना १९९२ साली पद्मश्री आणि २०१५ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर राहील. त्यांच्या निधनाने एक महान कलाकार हरपला असला, तरी त्यांच्या चित्रपटांच्या रूपात त्यांची आठवण कायम राहील. संपूर्ण देश आज एका खऱ्या देशभक्त अभिनेत्याला अखेरचा निरोप देत आहे.