जान्हवीनं घेतलं नवं घर!; किंमत 39 कोटी!!
मुंबईच्या जुहू भागातील एका अलिशान इमारतीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूरने नवं घर घेतलं आहे. तीन मजल्यांवर हे तिचे घर असेल. गेल्या वर्षी 7 डिसेंबरला तिने घराचा करार केला होता, आता हे घर प्रत्यक्षात साकारलं आहे. तब्बल 3,456 स्क्वेअर फूटमध्ये जान्हवीचं नवं घर आहे. तब्बल 39 कोटींना तिने ते विकत घेतलं. या घरासाठी तिने 78 लाख रुपये स्टँप ड्युटी भरली आहे. 2018 मध्ये धडक या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. तिचा गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. झोया अख्तर दिग्दर्शित घोस्ट स्टोरीजमध्येही ती दिसली होती. मात्र हा चित्रपट फारसा चर्चेत आलाच नाही. सध्या ती दोस्ताना 2 आणि रुही अफ्जाना या दोन चित्रपटांत काम करत आहे. वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूर यांच्यासोबत ती सध्या लोखंडवाला या ठिकाणी राहते.