उर्वशीने सांगितल्या वाढदिवसाच्या आठवणी!
आई-बाबा हेच माझे सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहेत. कारण ते माझ्या कायम पाठीशी असतात. इतके चांगले आई-वडील मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते, असे भावनिक उद्गार काढलेत ते अभिनेत्री उर्वशी रौतेलाने. तिचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिला वाढदिवस काही चांगला साजरा करता आला नाही. आपला भाऊ आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत तिने वाढदिवस सेलिब्रेट केला. शूटिंगच्या सेटवरही छोटं सेलिब्रेशन केलं. आता ती घरच्यांसोबतही वाढदिवस साजरा करणार असल्याचे तिने सांगितलं. आपल्या वाढदिवसाला एलॉन मस्क, व्लामिदिर पुतिन आणि शाहरुख खानला पार्टीला बोलवायला आवडेल, असे उर्वशीने सांगितलं. सनी देओलच्या ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या उर्वशीने ग्रेट ग्रँड मस्ती, सनम रे, हेट स्टोरी ४, पागलपंती, वर्जिन भानुप्रिया आदी चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. लहानपणीच्या वाढदिवसाच्या आठवणींना तिने यावेळी उजाळा दिला. ती म्हणाली, की वाढदिवसासाठी मी एक महिना आधीपासूनच खरेदीला सुरुवात करायचे. मनासारखा ड्रेस मिळेपर्यंत भरपूर दुकानं फिरायचे, असे ती म्हणाली. सध्या ती अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या चित्रपटात काम करत असून, चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.