सोयाबीनवर “मरूका’चे आक्रमण; केळवद परिसरात सर्वेक्षणातून आले निदर्शनास!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग यांच्या संयुक्त चमूने जिल्ह्यातील केळवद परिसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर मारूका या किडींचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. ही कीड मुख्यत: मूग, उडीद व तूर या कडधान्य पिकावरील शेंगा पोखरणारी पंतवर्गीय अळी असून या भागामध्ये सर्वेक्षण चमुने शेतकऱ्यांसमवेत केलेल्या सर्वेक्षणानुसार उडीद व सोयाबीन पिकाचे खोड पोखरत असल्याचे आढळून आले. याकिडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे चट्टे आढळून येतात. मरूका अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असून, तिच्या पाठीवर तपकीरी काळपट ठिपक्यांच्या सहा जोड्या आढळतात. अंड्यातून निघालेली अळी, कळ्या, फुले व कोवळी पाने एकत्र करून त्यांचे झुपके तयार करते. त्यावर आपली उपजिवीका करते. त्यामुळे फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होत नाही. काही वेळेला अळी मुख्य खोड व फांदीच्या जोडातून खोडात प्रवेश करते व खोडाच्या पोखरण्यामुळे झाडाला होणाऱ्या अन्नद्रव्याचा पुरवठा विरुद्ध होतो. त्यामुळे शेंगा भरत नाहीत. शेतात या किडीच्या बाह्य लक्षणांवरून प्रादुर्भाव ओळखणे कठीण जाते. प्रादुर्भाव ओळखण्यासाठी सोयाबीनच्या एक एकर शेतातील वेगवेगळ्या ठिकाणचे २० ते २५ झाडे उभी चिरून त्यात अळीचे निरीक्षण करावे. निरीक्षणादरम्यान ५ ते १० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास आवश्यकतेप्रमाणे रासायनिक किटकनाशकांचा वापर करून या किडींचे व्यवस्थापन करावे.
ही करा फवारणी
फ्लुबेंडामाईड २० डब्ल्यू जी ६ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी. २० ग्रॅम किंवा नोवालुरोन ५.२५ अधिक ईडोक्साकार्ब ४.५० एसपी १६ मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावरस्प्रेने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकाचह मात्रा तिप्पट करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्यावेळी किटकनाशकाची फवारणी आदला बदल करावी. या किटकनाशकासोबत इतर किटकनाशक, बुरशीनाशक, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये आदी मिसळू नये. किटकनाशकांच्या शिफारशी तदर्थ स्वरूपाच्या असून शेतकरी बांधवांनी तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने प्रसारीत करण्यात येत आहे.