जिल्हा कृषी विभागाचा सल्ला ः सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा किडीचे असे करा व्यवस्थापन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पुर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधूंनी उपाययोजना कराव्यात. चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा 15 दिवसांतून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, याकरिता सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या 30-35 दिवसानंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोराट्रॅनिलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 % + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 % झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.