तुम्‍हाला माहितेय डेबिट कार्डच्या १६ अंकांचा अर्थ काय?

मुंबई : डिजिटल व्यवहारात डेबिट कार्डला किती महत्त्व आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. डेबिट कार्डमुळं वारंवार पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. पैसे हस्तांतरणाची सोय झाली, तसेच रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. खरेदीसाठी डेबिट कार्डचा वापर वाढला आहे. कधीही आणि कुठूनही पैसे काढता येत असल्यानं नागरिक आता बिनधास्त झाले आहेत. बँकेच्या खात्यात …
 

मुंबई : डिजिटल व्यवहारात डेबिट कार्डला किती महत्त्व आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. डेबिट कार्डमुळं वारंवार पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. पैसे हस्तांतरणाची सोय झाली, तसेच रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. खरेदीसाठी डेबिट कार्डचा वापर वाढला आहे. कधीही आणि कुठूनही पैसे काढता येत असल्यानं नागरिक आता बिनधास्त झाले आहेत.

बँकेच्या खात्यात पैसे असले, की कितीही, कुठंही आणि काहीही खरेदी करता येते. डेबिट कार्डावर नाव, वापरण्याची अंतिम मुदत, डेबिट कार्डाच्या बँकेचं नाव, सीव्हीही क्रमांक असतो. त्याबाबत आपल्याला माहिती असते. डेबिट कार्डचा १६ आकडी क्रमांक असतो. त्यात वेगवेगळे अर्थ दडलेले असतात. क्रमांक १६ अंकीच का, याचं उत्तर माहीत असायला हवं. या क्रमांकाच्या मदतीने आॅनलाईन व्यवहार केला जातो, तेव्हा पेमेंट सिस्टमला हे नेटवर्क कोणत्या कंपनीचं आहे याचा शोध घेतं. हे नंबर बँक खात्याची माहिती देतात. ऑनलाईन पेमेंट करताना डेबिट कार्डवरचा १६ अंकी नंबर भरावा लागतो. कार्डावरचे पहिले ६ अंक बँकेची ओळख दाखवतात. त्यानंतरचे दहा आकडे खातेदाराचा युनिक खाते क्रमांक दाखवितात. डेबिट अथवा एटीएम कार्डवरील ग्लोबल होलोग्राम हा सुरक्षा होलोग्राम आहे. त्याची कॉपी करणे अवघड आहे. त्याचं कारण हा होलोग्राम थ्री डी आहे.

पहिल्या अंकाचा अर्थ कोणत्या इंडस्ट्रीचे हे कार्ड आहे, त्याची माहिती दर्शवितो. त्याला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर म्हणतात. भिन्न उद्योगांसाठी हे भिन्न असते. १- ISO आणि अन्य इंडस्ट्रीज, २- एअरलाईन्स, ३- विमान कंपन्या आणि इतर उद्योग, ४ – ट्रॅव्हल आणि मनोरंजन, ५ बँकिंग आणि वित्त, ६ – बँकिंग आणि वित्त (मास्टर कार्ड) ७ – बँकिंग आणि मर्चेंडायजिंग, ८- पेट्रोलियम, ९ – टेलिकॉम आणि इतर उद्योग. त्यानंतर शेवटचा अंक वगळता, म्हणजे 7 व्या ते १५ व्या अंकांपर्यंतचा संबंध बँक खात्याशी जोडलेला असतो. हा बँक खाते क्रमांक नाही; परंतु तो ग्राहकांच्या खात्याशी जोडला आहे. त्यामुळं घाबरण्याचं काहीच कारण नाही. या नंबरवरून कुणाच्या खात्याची माहिती कोणत्याही अन्य व्यक्तीला मिळत नाही. कोणत्याही डेबिट कार्डच्या शेवटच्या अंकाचा अर्थ चेकसम डिजीट असतो. हा अंक कार्ड वैध आहे की, नाही हे शोधण्यासाठी वापरला जातो.