घरोघरी असावी जिजाऊंसारखी माता!

राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या विचारांची मशाल पुन्हा प्रज्ज्वलित करून आजच्या काळात तेवढ्याच ऊर्जेने त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. अराजकतेच्या पार्श्वभूमीवर स्वबळावर शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ! विखुरलेल्या देशबांधवांना एकत्र आणून स्वराज्य उभं करणार्या राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. जिजाऊंचे व्यक्तीमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, इच्छाशक्ती व गरिबांप्रती प्रचंड …
 

राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या विचारांची मशाल पुन्हा प्रज्ज्वलित करून आजच्या काळात तेवढ्याच ऊर्जेने त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर स्वबळावर शिवराज्य उभं करणार्‍या राजमाता म्हणजे जिजाऊ! विखुरलेल्या देशबांधवांना एकत्र आणून स्वराज्य उभं करणार्‍या राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे.

जिजाऊंचे व्यक्तीमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, आत्मविश्‍वास, इच्छाशक्ती व गरिबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे, म्हणूनच त्यांच्या विचारांची साधी आठवणही आपल्याला महत्त्वाकांक्षी आणि आक्रमक केल्याशिवाय राहत नाही. पण हे कालातीत विचार फक्त जिजाऊ जन्मोत्सवापुरेत मर्यादित असतील व नंतर तेवढ्याच निष्क्रियतेने ते विसरून आपण परत आपल्या कामात व्यस्त होणार असू तर आपल्याला देवाला, समाजाला, व्यवस्थेला किंवा नशीबाला दोष देण्याचा हक्कच नाही. आज 400 वर्षांनंतर काळ बदलला असेल पण देशाची सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला त्याच संवेदनशीलतेची गरज आहे जी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रोवली. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत. जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश- निराश झाल्या नाहीत. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्त्रियांनी आत्मसात केला पाहिजे. आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी, निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते. आजच्या स्त्रिया शिकलेल्या आहेत पण मुलांना कमी वयात मोबाईल फोन्स देण्यात त्यांना धन्यता वाटते. पाश्‍चात्त्यकरण आज फक्त मुंबई – पुण्यापर्यंत मर्यादित न राहता ग्रामीण भागात पोहोचले आहे. जागतिकीकरणाच्या काळात ते होणे साहाजिकच पण त्यासाठी आपण काय किंमत मोजत आहोत हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे. मुलांना घडवणे तर दूर पण त्यांना एक संवेदनशील, आदरयुक्त, विनम्र आणि जबाबदार नागरिक बनवणे हे देखील आपल्याला आज अवघड जात आहे. आपल्या मातीत जन्म घेतलेल्या पदार्थ – वस्त्र- व्यक्ति-भाषा-खेळ-व्यवसाय-संस्कृती-विचार यांची लाज वाटण्याच्या नीतिमत्तेपर्यंत आपली मजल पोहोचली आहे. पाश्‍चात्य देशातून आलेल्या गोष्टींचा उदोउदो करणे आणि आपल्या स्थानिक गोष्टी, पध्दतींना कमी लेखने यातच आपण मोठेपणा समजतो. आपल्या तरुणांना भारतीय इतिहास माहीत नाही. इतिहासाच्या नावाखाली मारहाण करायला जेवढे आपण तत्पर असतो तेवढेच मागे त्याबद्दल अभ्यास करण्यात. पाश्‍चात्य मुल्ये, परंपरा, योद्धे, तत्त्वज्ञान, विचारवंत यांचा अभ्यास आपली मुले शाळेत असल्यापासून करतात. ज्यामुळे ती फक्त क्लोन्स बनत आहेत जी उत्तमरित्या निर्यात होऊ शकतात. उदा. शेक्सपियरचे कव्य वाचलेले अनेक विद्यार्थी आढळतील पण कालिदास सारख्या कवीचे नाव खूप कमी जणांना माहित असेल. त्यामुळे आपण आपल्या मुळांबद्दल अज्ञात राहतो आणि सहजच दिशाहीनतेचा व भरकटलेपणाचा शिकार होतो. देशभक्ती आणि राष्ट्रवादात यामुळे आपण कमी पडतो. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत भारताचा खालचा क्रमांक येण्याचे कारण कुठेतरी या मुद्द्याशी जोडला जाऊ शकतो असे मला वाटते. या पद्धतीने अनेक मावळे गमावून बसल्यावर लोकतंत्र रूपी स्वराज्य कमकुवत राजकारण्यांच्या हाती जातं. आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.

– अ‍ॅड. पल्लवी विरेंद्र सोळंके