आसान होता तो हर कोई किसान होता…
किसान ब्रिगेड : किसान जागृती सायकल यात्रा
वृत्तदर्पण : राजेंद्र काळे
तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी… तू न मुडेगा कभी, कर शपथ- कर शपथ… अग्नीपथ-अग्नीपथ-अग्नीपथ!
अग्नीपथ, हाच प्रकाशभाऊ पोहरे यांच्या जगण्यातील वास्तवभाग. मार्च महिना तसा ऋतुबदलाचा काळ, या महिन्यातलं ऊन कमालीचं त्रासदायक, पण या उन्हा-तान्हाची पर्वा न करता वयाच्या ६७व्या वर्षी किसान ब्रिगेडच्या आंदोलनकारी सवंगड्यांसह प्रकाशभाऊ निघालेत सायकली घेवून तापणाऱ्या पश्चिम विदर्भातील खडतर रस्त्यांवरुन. तसं भाऊंचं हे वय आरामाचं, पण ‘आराम हराम है..’ ही म्हण भाऊंच्या वागण्याला समर्पकच. ‘राह में खतरे संकट है तो ठहरता कौन है..’ या निर्धारानं ३ मार्चला राजमाता जिजाऊ माँ साहेबांना अभिवादन करुन मातृतिर्थ सिंदखेडराजावरुन निघाली किसान ब्रिगेडची ‘किसान जागृती सायकल यात्रा’.
जिजाऊ सृष्टीवरुन आरंभ होतांना यात्रेसाठी खास करुन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, राकाँ.जिल्हाध्यक्ष अॅड.नाझेर काझी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या सायकल रॅलीला अमरावती विभागातील वाढत्या कोरोनाचे कारण पुढे करुन निर्माण करण्यात आलेल्या संचारबंदीसदृष्य कारणांमुळे आधीच प्रशासकीय अडथळा शासकीय यंत्रणांकडून निर्माण करण्यात आला होता. स्थानिक यंत्रणेनंतर ही यात्राच रद्द करण्याची नोटीस किसान ब्रिगेडप्रमुख प्रकाशभाऊंना पाठवली होती, पण मागे हटतील, ते प्रकाशभाऊ कसले? ते सायकली घेवून सिंदखेडराजात पोहचल्यावर प्रशासनाला नमते घेवून एसडीओं.ना परवानगी द्यावीच लागली. उद्घाटनानंतर दुसरबीड, बिबी, लोणार मार्गे ही यात्रा वाशिम जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली. पुढे ही यात्रा यवतमाळ, वर्धा, नांदेड व अमरावती जिल्ह्यातही उस्फुर्त प्रतिसादातून किसान जागृतीचे प्रभावी काम करत असून १७ मार्चला यात्रेचा समारोप ‘वेदनंदीनी’वर होणार आहे. या यात्रेदरम्यान, विविध घटना घडत असून १३ मार्चला यात्रा जेंव्हा गुरुकुंज मोझरीला पोहोचली तेंव्हा लॉक करण्यात आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ ‘अनलॉक’ करुन घेण्याचे क्रांतीकारी पाऊल भाऊंनी उचलले.
प्रकाशभाऊंसोबत या रॅलीमध्ये किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे, सुभेदार मंजर शेषराव मुरोडीया, रामदास मानव (उत्तरप्रदेश) तर केवळ ११ वर्षीय सिध्दांत सतिशचंद्र रोठे हे प्रारंभीपासून नॉनस्टॉप सायकली चालवित आहेत. एकाच दिवशी ३ ते ४ कॉर्नर मिटींग्जही होत असून, त्यालाही त्या-त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या नावाखाली नागरीकांना नाहक त्रास दिल्या जात आहे, त्याबद्दल अडवणूक करणाऱ्या पोलिसांना सुनावल्याचा यात्रेदरम्यानचा प्रकाशभाऊंचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला.
एकूणच, ‘किसान ब्रिगेड’च्या या यात्रेने सरकारच्या कृषी कायद्याविरोधात चालविली आहे ती.. किसान जागृती!
यह महान दृश्य है, चल रहा मनुष्य है..
अशृ स्वेद रक्त से, लथ-पथ, लथ-पथ..
अग्नीपथ-अग्नीपथ-अग्नीपथ!!
अग्नीपथ, हाच किसान जागृती सायकल यात्रेचा आव्हानात्मक पथ. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यांवरुन सायकल चालविणे म्हणजे कसरतच, पण त्या अग्निदिव्यातून, ‘किसान ब्रिगेड’ प्रवास करीत आहे..
खरंच ही ‘आसान’ गोष्ट नाही. ८ मार्च या जागतिक महिला दिनी महिंद्रा ट्रॅक्टरची एक जाहीरात तुफान व्हायरल झाली, त्यात एक ‘कृषीकन्या’ ट्रॅक्टरची ‘ड्राईव्ह टेस्ट’ द्यायला आरटीओ. कार्यालय परिसरात येते.. तेंव्हा तिच्या तोंडून जे वाक्य बाहेर पडते, ते किसान व्यवस्थेचीच मान उंचावून जाते. तो आरटीओ. तिला म्हणतो- ये इतना आसान नही है. तेंव्हा ती मुलगी म्हणते- आसान होता तो हर कोई किसान होता..!
शेतकरी होणं, खरंच तोंडाचा खेळ नाही. राब-राब राबावं लागतं, काळ्या मातीत. त्यात अवर्षण, अतिवृष्टी, महापूर व गारपिटीसारखी अस्मानी संकटं. ही नैसर्गिक संकटं शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुंजलेली असतांना, सुल्तानी संकटंही शेतकऱ्यांची पाठ सोडता सोडत नाही. पावसानं झोडपलं व राजानं फटकारलं, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची होवून जाते. काही मूठभर उद्योगपतींसाठी उभ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कसे दावणीला बांधल्या जाते, याचे उदाहरण म्हणजे वेंâद्र सरकारने केलेले कृषी कायदे. कुठलीही मागणी नसतांना मोदी सरकारने हे कायदे देशातील शेतकऱ्यांच्या जणु माथीच मारले. खरंतर याच कायद्यांचा निषेध करण्यासाठी ‘सिंदखेडराजा ते अकोला’ अशी ९०० किलोमीटरची ‘किसान जागृती सायकल यात्रा’ ३ ते १८ मार्चपर्यंत सुरु आहे. ३ काळ्या कायद्याच्या विरोधात लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर १०० दिवसांपासून ठाण मांडून असतांना, सरकार मात्र बिनफिकीर आहे. भौगोलिक अंतरामुळं महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीत जावू शकत नसलेतरी, त्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी १४ दिवसांची सायकल यात्रा काढून किसान ब्रिगेडने शेतकरी आंदोलनाला संपुर्ण पाठींबा दर्शविला आहे. प्रकाशभाऊंसोबत अविनाश काकडे, गजाजन अहमदाबादकर, सतिशचंद्र रोठे आदी या कायद्याविरोधात जगजागरण करुन रान पेटवत आहे. याशिवाय इंधन दरवाढ, वाढीव विजबिले, वीज तोडणी व कर्जमाफी आदी विषयांवरही या यात्रेच्या माध्यमातून आवाज उठविल्या जात आहे. कोरोनाच्या नावाखाली चाललेला खेळखंडोबा सांगितल्या जात आहे. यात्रेच्या संयोजनात लोकनाथ काळमेघ यांचीही मध्यवर्ती भूमिका असून, ज्या-ज्या जिल्ह्यातून यात्रा जात आहे तिथली ‘देशोन्नती’ची टिमही आयोजनात अग्रभागी आहे.
एकूणच, ही सायकल यात्रा म्हणजे ‘जगन्नाथाचा रथ’ आहे, यात केंद्रस्थानी आहेत ते लोकनायक प्रकाशभाऊ पोहरेच. त्यांची अफलातून जिद्द व कमालीच्या उत्साहातून मार्गाक्रमण करत आहे ती.. किसान ब्रिगेडची, किसान जागृती.. सायकल यात्रा!!
(पूर्वप्रसिद्धी ः दै. देशोन्नती)