Buldana Live Sunday Special : बुलडाण्याला किती दिवस लागत राहणार त्‍यांची ‘काळी’ नजर?

धूर सोडत अनेक वाहनांची रस्त्यावर धूम…; “पीयूसी’चाचण्यांबद्दलची अनभिज्ञता अन् कारवाईचा अत्यल्प टक्का ठरतोय जबाबदार!!बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आजघडीला अशी अनेक वाहने आहेत, जी धूर सोडत रस्त्यावरून धावत आहेत. कारण त्यांना पीयूसी चाचणीचे एकतर ज्ञान नाही किंवा गांभीर्य नाही… मुळात जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण अगदीच कमी आहे. त्यामुळे त्यांनी …
 
Buldana Live Sunday Special : बुलडाण्याला किती दिवस लागत राहणार त्‍यांची ‘काळी’ नजर?

धूर सोडत अनेक वाहनांची रस्‍त्‍यावर धूम…; “पीयूसी’चाचण्यांबद्दलची अनभिज्ञता अन्‌ कारवाईचा अत्‍यल्‍प टक्‍का ठरतोय जबाबदार!!
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः
जिल्ह्यात आजघडीला अशी अनेक वाहने आहेत, जी धूर सोडत रस्‍त्‍यावरून धावत आहेत. कारण त्‍यांना पीयूसी चाचणीचे एकतर ज्ञान नाही किंवा गांभीर्य नाही… मुळात जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण अगदीच कमी आहे. त्‍यामुळे त्‍यांनी पीयूसी चाचणी प्रमाणपत्र मागणे दूरचीच गोष्ट… अधूनमधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात येते. त्‍यातून एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ या चार महिन्यांत जिल्ह्यातील २४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्‍यांच्‍याकडून २ लाख ४१ हजार रुपये असा घसघशीत दंड वसूल करण्यात आला आहे. वायूवेग आणि महसूल सुरक्षा पथकाने हा दंड वसूल केला. पीयूसी नसणाऱ्यांवर कारवाया वाढणे गरजेचे आहे तरच प्रदूषणापासून जिल्हा मुक्‍त राहू शकतो. अन्यथा निसर्गरम्‍य बुलडाण्याला पीयूसीबद्दल गांभीर्य नसणाऱ्यांची काळी नजर लागतच राहणार आहे.

पीयूसी चाचणीसाठी जिल्ह्यात विविध १६ ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑनलाइन पीयूसी सेंटरचे परवाने दिले आहेत. या सेंटरवर डिझेल वाहनांसाठी ११० रुपये, पेट्रोलवर धावणाऱ्या ४ चाकी वाहनांसाठी ९० रुपये तर दुचाकीसाठी केवळ ३५ रुपयांचे शुल्क आकारले जाते. सेंटरच्‍या देखभाल आणि अन्य खर्चाच्‍या तुलनेत हे दर अत्‍यंत कमी असून, ते वाढविण्याची मागणी सेंटरचालक करत असतात. नियमित पीयूसी तपासणी केल्याने वाहनसुद्धा चांगले टिकते व प्रदूषणाला सुद्धा आळा बसतो.

अनेक वाहनधारक पीयूसीबद्दल अनभिज्ञ
अनेक वाहनधारकांना पीयूसी म्‍हणजे काय, हेच माहीत नसते. पीयूसी म्हणजेच पोल्‍यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट अर्थात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. वाहनांसाठी जसे लायसन्स, इन्शुरन्स, आरसी बुक अशी कागदपत्रे महत्त्वाची असतात. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सुद्धा रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांसाठी तेवढेच आवश्यक असते. पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर वाहतूक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी वाहनधारकांकडून दंड वसूल करू शकतात. ही दंडाची रक्कम सुद्धा कमी नसून, नॉन -ट्रान्सपोर्ट वाहनांना म्हणजेच दुचाकी, कार यांना १ हजार रुपये तर प्रवाशी वाहतूक किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना १२०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

पोलीस विचारत नाहीत म्‍हणून…
आपल्या बुलडाणा जिल्ह्यात १० पैकी ८ वाहनधारकांना पीयूसीबद्दल माहितीच नसल्याचे बुलडाणा लाइव्हच्‍या सर्वेक्षणात समोर आले. वाहनावर कर्ज घेणे, वाहन खरेदी किंवा विक्री करणे तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंद करतेवेळीच वाहनधारकांना पीयूसीबद्दल कळते. पेट्रोल आणी डिझेलवर चालणारी वाहने हवेत धूर सोडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. वाहनाची नियमित देखभाल न केल्यास अशी वाहने जास्त प्रमाणात प्रदूषण करतात. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. कमी प्रमाणात प्रदूषण व्हावे यासाठी वाहनांची पीयूसी चाचणी केली जाते. निर्धारित मर्यादेपेक्षा वाहन जास्त प्रदूषण करत असेल तर वाहनाच्या इंजिनचे काम करायला सांगितले जाते. अशा वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र दिले जात नाही. बीएस -३ आणि बीएस -४ वाहनांनी सहा महिन्यांतून एकदा तर बीएस-५ आणि बीएस -६ वाहनांनी वर्षातून एकदा पीयूसी चाचणी करणे मोटार वाहन कायद्याअंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या कायद्याची जनजागृती होताना दिसत नाही. वाहतूक पोलीसदादाही वाहनधारकांना पीयूसीबद्दल विचारणा करताना दिसत नाहीत. त्‍यामुळे वाहनधारक आपली धूर सोडणारी वाहने बिनदिक्‍कत दामटत असतात.

जिल्ह्यातील वाहनांची संख्या

  • मोटारसायकली : ४,०५,२३८
  • कार : २१,८३०
  • जीप : ३२२
  • रिक्षा : ५१५३
  • स्लीपर कोच : ०७
  • स्‍कूल बस : ५०६
  • व अन्य असे मिळून एकूण वाहने ः ५,१३,९३८

१० वर्षांपूर्वी रस्त्यावर वाहने कमी होती. त्यामुळे प्रदूषण कमी होते. मात्र अलीकडच्या काळात श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाहनांच्या पीयूसी तपासण्या होत नसल्याने वाहने जास्त प्रमाणात प्रदूषण करतात. वाहनांनी सोडलेला घातक धूर नाकावाटे, तोंडावाटे शरीरात जातो. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे.

-डॉ. पंढरी इंगळे, चिखली