कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्ह्यात टास्‍क फोर्स!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820) ः कोविड -19 आजारामुळे संकटात सापडलेल्या बालकांसाठी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सदस्य हे जिल्हा पोलीस अधीक्षक, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष बाल कल्याण समिती, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा माहिती अधिकारी कृती दलाचे …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820) ः कोविड -19 आजारामुळे संकटात सापडलेल्या बालकांसाठी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सदस्य हे जिल्हा पोलीस अधीक्षक, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष बाल कल्याण समिती, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा माहिती अधिकारी कृती दलाचे समन्वयक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्य पाहणार आहेत.

कृती दलाची पहिली बैठक काल, १९ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्‍या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी, ‍जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदींसह जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आई- वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचा व ज्यांचे आई- वडील किंवा पालक कोरोना या आजाराच्या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल असून, निवारा आणि मदतीची अत्यावश्यक गरज आहे अशा बालकांचा शोध घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यात अशा बालकांसाठी शून्य ते ६ या वयोगटासाठी शिशुगृह, ६ ते १८ वयोगटासाठी बालगृह निश्चित करण्याचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास विभागाला जिल्हाधिकारी यांनी दिले. संकटात सापडलेल्या अशा बालकांची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर देण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. बालकांच्या संविधानिक व बाल हक्कांच्या संरक्षणासाठी कृती दलामार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस विभाग यांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्णालये, खासगी दवाखाने तसेच कोविड सेंटर येथे महिला व बाल विकास विभागाचे मदत क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे करण्याचे आवाहन या कृती दलामार्फत करण्यात आले आहे.

बालकांसाठी मदत क्रमांक

  • चाईल्ड लाईन टोल फ्री.1098
  • महिला व बाल विकास विभाग मदत संपर्क क्रमांक – 8308992222/74०००15518
  • बाल कल्याण समिती बुलडाणा संपर्क क्रमांक – 8380940778/8805520308/9423748019/9421657145
  • बालगृह संपर्क क्रमांक – 9960338000
  • शिशुगृह संपर्क क्रमांक – 9422881932/7498543635
  • जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संपर्क क्रमांक – 8975600631
  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बुलढाणा – 9421566834

जिल्हा कृती दलामार्फत संकटात सापडलेल्या मुलांसाठी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करून देण्यात येत आहे. ज्या बालकांची जबादारी पालक, नातेवाईक यांच्याकडून घेण्यास अक्षम असतील अशा बालकांना दत्तक विधान प्रक्रियेमार्फत पालक मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

– अध्यक्ष बाल कल्याण समिती बुलडाणा

महामारीमुळे संकटात सापडलेल्या बालकांचा गैरफायदा घेऊन अनैतिक पद्धतीने दत्तक घेणाऱ्यांवर कायदेशीर कावाई करण्यात येईल. तसेच बालकांना सुरक्षा देऊन त्यांचे बाल कल्याण समिती आणि जिल्हा कृती दलामार्फत विधीयोग्य पुनर्वसन करण्यात येईल.

– अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक, बुलडाणा