मतांची झाली होती कडकी म्हणून बहीण झाली होती लाडकी! लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र केल्यामुळे ॲड. जयश्री शेळकेंची संतप्त प्रतिक्रिया;

म्हणाल्या, लाडक्या बहिणी बद्दलचे प्रेम दिखावा, हे पुतना मावशीचे प्रेम...
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य सरकारने आता पुन्हा एकदा अर्ज तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत राज्यभरातून ४० लाख लाडक्या बहिणी अपात्र केले आहेत. यावरून महायुती सरकारला विरोधी पक्षांकडून टीकेचे लक्ष केल्या जात आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी देखील महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मतांची कडकी झाली होती म्हणून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. जनतेला फसवून त्यांनी मते मिळवली खरी मात्र आता महायुती सरकारने त्यांचा खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणी बद्दलचे प्रेम केवळ देखावा होता, हे पुतना मावशीचे प्रेम होते असा घणाघात जयश्री शेळके यांनी केला आहे.

महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पुन्हा सुरू केली आहे. अडीच लाख उत्पन्न आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येत आहे. सरकारच्या ह्या निर्णयामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील २३ हजार ७७८ महिला लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरले आहेत.अद्याप अर्जांची तपासणी सुरू असल्याने अपात्र ठरणाऱ्या महिलांचा आकडा वाढू शकतो..